विजय मल्ल्याने केले ‘हे’ ट्विट अन् यूजर्सकडून पडला कमेंट्सचा पाऊस

| Updated on: Sep 01, 2022 | 2:52 AM

मल्ल्याने एक ट्विट केले आणि युजर्सकडून त्याच्याविरोधात कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पडला. निमित्त होते ते गणेशोत्सवाच्या शुभेच्छांच्या ट्विटचे.

विजय मल्ल्याने केले हे ट्विट अन् यूजर्सकडून पडला कमेंट्सचा पाऊस
विजय माल्या
Follow us on

नवी दिल्ली : एकेकाळी मद्यसम्राट म्हणून देशभर प्रसिद्धीच्या झोतात राहिलेला उद्योजक विजय मल्ल्या (Vijay Mallya) सध्या करोडोच्या घोटाळ्यामुळे ‘कुख्यात’ म्हणून सर्वांच्याच रडारवर आहे. एकीकडे भारतातील सर्वच तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियात त्याची कुठलीही ऍक्टिव्हिटी दिसताच इथेही तो चांगलाच ट्रोल होतो. आजही तसाच किस्सा घडला. मल्ल्याने एक ट्विट (Tweet) केले आणि युजर्सकडून त्याच्याविरोधात कमेंट्स (Comments)चा अक्षरशः पाऊस पडला. निमित्त होते ते गणेशोत्सवाच्या शुभेच्छांच्या ट्विटचे. त्यावर युजर्सने घोटाळ्यात बुडालेल्या कोट्यवधींच्या पैशांवरून जाब विचारला. त्यामुळे विजय मल्ल्याला त्याची ‘टिवटिव’ तिथेच थांबवावी लागली.

सोशल मीडियातील युजर्सने मल्ल्याला भंडावून सोडले, कारण…

देशभरात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. लोक आपापल्या परीने एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. याचदरम्यान सध्या विदेशात असलेल्या मल्ल्याने शुभेच्छांचे एक ट्विट केले आणि पुढे ज्या कमेंट्स आल्या, त्या वाचून कुणालाही हसू येईल. अनेक युजर्सनी त्याच्याकडे थेट पैसे परत करण्याच्याच मागणीचा तगादा लावला.

मल्ल्या वॉन्टेड आरोपी

मल्ल्या हा हजारो कोटींच्या घोटाळ्याच्या प्रकरणात भारताला हवा असलेला अर्थात ‘वॉन्टेड आरोपी’ आहे. त्याला भारतात परत आणण्यासाठी सरकार प्रयत्न करतेय. अशा परिस्थितीत जेव्हा मल्ल्याने ट्विट केले, तेव्हा सोशल मीडिया युजर्सनी त्याला पैसे परत करण्याची मागणी करीत भंडावून सोडले.

हे सुद्धा वाचा

‘घर आ जा परदेसी….’ मल्ल्याच्या ट्विटची अनेकांनी उडवली खिल्ली

विजय मल्ल्याने बुधवारी दुपारी 2 वाजून 37 मिनिटांनी एक ट्विट केले. पुढच्या काही वेळातच वाऱ्याच्या वेगाने ते ट्विट व्हायरल झाले. याचवेळी कुणी त्याला भारतात परत येण्यास सांगितले, तर कुणी बँकांकडून लुटलेले पैसे आधी परत करा, असा टोला हाणला.

अनुराग निगम नावाच्या युजर्सने तर भारीच कमेंट दिली. ‘अरे पैसे परत करा, भारतात सगळे सण आनंदात जातील’, असे उत्तर देत मल्ल्याची फिरकी घेतली, तर विराट नावाच्या युजर्सने ‘घर आ जा परदेसी, तेरा देश बुलाए रे,’ अशी हटके साद घातली. विराटच्या कमेंट्सची दिवसभर चांगलीच चर्चा रंगली.

विशेष म्हणजे नंतर अनेक युजर्सने विराटच्याच कमेंट्सची ‘री’ ओढली. या कमेंट्स वाचून मल्ल्याने नक्कीच कपाळावर हात मारून घेतले असतील. किंबहुना पुढच्या वेळी ट्विट करताना मल्ल्या एकदा नव्हे, तर हजारवेळा विचार करेल, हे नक्की. (Lots of comments from users on Vijay Mallyas tweet)