पार्किंगवरुन मामाचा वाद, मध्यस्थी करणाऱ्या भाच्यावर हल्ला, भाऊबीजेलाच चार बहिणींचा ‘दादा’ हरपला

| Updated on: Nov 08, 2021 | 1:40 PM

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी तरुण मामाच्या घरी पोहोचला होता. कार पार्क करण्याच्या मुद्द्यावरून मामाचा वाद सुरु असताना भाच्याने मध्यस्थी केली. यावेळी त्याला प्राण गमवावे लागले

पार्किंगवरुन मामाचा वाद, मध्यस्थी करणाऱ्या भाच्यावर हल्ला, भाऊबीजेलाच चार बहिणींचा दादा हरपला
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

भोपाळ : मामाच्या घरी दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या भाच्याला हकनाक जीव गमवावा लागला. कार पार्क करण्यावरुन मामाचे भांडण होत असताना भाच्याने मध्यस्थी केली. मात्र यावेळी धारदार शस्त्रांनी वार करुन टोळक्याने त्याची हत्या केली, तर मामा गंभीर जखमी झाला आहे. मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणी 10 जणांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

22 वर्षीय राजा वर्मा मध्य प्रदेशातील इंदिरा नगर खरगोन येथे राहत होता. खरगोनपासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या बरुड पोलीस स्टेशन हद्दीतील उमखळी येथे त्याचे मामा पप्पू वर्मा राहतात. पप्पू वर्मांचे कार पार्क करण्यावरून गावातीलच काही जणांसोबत किरकोळ भांडण झाले होते. यानंतर पप्पू वर्मांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

त्या दिवशी काय घडलं?

पोलिसात तक्रार दिल्यानंतर काही जण धारदार शस्त्रांसह पप्पू वर्मांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी हल्ला केला. मामाशी वाद सुरु असताना राजाही मध्यस्थी करण्यासाठी पोहोचला. त्यावेळी काही जणांनी राजावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. जखमी अवस्थेत मामा-भाच्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भाऊबीजेच्या दिवशीच दादा गेला

धारदार शस्त्रांनी झालेल्या खोल जखमांमुळे शनिवारी राजाचा मृत्यू झाला, तर मामा पप्पू वर्मा यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत राजाला चार बहिणी आहेत. तो चौघी बहिणींचा एकुलता एक भाऊ होता. ऐन भाऊबीजेच्या दिवशी राजाच्या मृत्यूमुळे बहिणींचा आधार हरपला.

मामा म्हणतो आरोपींना फाशी द्या

राजाचे मामा पप्पू उर्फ श्यामलाल वर्मा यांच्या माहितीनुसार ट्रॅक्टर-ट्रॉली उभ्या करण्यावरुन हा वाद झाला होता. त्यानंतर मी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. सायंकाळी ते शस्त्रास्त्र घेऊन आले आणि त्यांनी हल्ला केला. माझा भाचा राजा दिवाळी साजरी करण्यासाठी पाडव्याला आमच्या घरी आला होता. मध्यस्थी करत असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला, त्यात त्याचा मृत्यू झाला. गावातील अनेक जणांचा यात सहभाग होता. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि त्यांना जन्मठेप किंवा फाशीची शिक्षा द्यावी, अशी आपली इच्छा असल्याचं मामा म्हणाले.

संबंधित बातम्या :

पुण्यात 29 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, गोठ्यात डांबून दोघांकडून अत्याचार

कुटुंब आनंदात निघालेलं, हायवेवर अचानक कारमध्ये गोळी घुसली, दोन वर्षांच्या बालकाचा मृत्यू

छत्तीसगडमध्ये सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, चार जवानांचा मृत्यू, तिघे गंभीर