ट्रेनी फॉरेस्ट ऑफीसर पुजा नागले बनली सिंघम, ‘पुष्पा’च्या तावडीतून सोडवून आणलं सागाचं लाकूड
जंगलात ज्या झाडांना कापायचे आहे त्यांना खूणा केल्या जायच्या. त्यानंतर हरदा येथून कुशल मजूर आणून रात्रीच्या रात्री झाडं कापली जायची अशी माहीती ट्रक चालकाने दिली, त्याच्यासह सागाचं लाकूड विकत घेणाऱ्या वखार मालकाला या धाडसी कारवाईत अटक झाली.

नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील बैतूलच्या महूपानी जंगलात महीनाभरापूर्वी सागाच्या 22 झाडांची कत्तल करून सागवान लाकडाच्या माफीयांनी राजस्थान गाठले होते. सागवान तस्करांची टोळी ते लाकूड वनविभागाच्या चौक्या आणि नाके असताना इतक्या दूर कसे काय घेऊन गेले ? याचं कोडं वन अधिकाऱ्यांना सतावत होते. एका महिला ट्रेनी फोरेस्ट ऑफीसरने 57 तासाचं ऑपरेशन राबवून या प्रकरणात दोघा तस्करांना अटक करीत हे 12 लाख रुपये किंमतीचं लाकूड जप्त केल्याने तिचे सर्वत्र कौतूक होत आहे. कोण आहे ती महिला सिंघम ऑफीसर पाहूया…
मध्य प्रदेशातील बैतूल हे ताप्ती वन क्षेत्रात मोडत असून येथील लेडी IFS ऑफीसर पूजा नागले यांनी या प्रकरणात कारवाई करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे वरिष्ठही आश्चर्यचकीत झाले. जेव्हा राजस्थानातील सातशे किमी दूरपर्यंत सागवानाची लाकडे चोरून पसार झालेल्या टोळीचा छडा लावायचा निर्णय पूजा यांनी घेतला तेव्हा त्यांना परवागनी देताना एक ट्रेनी ऑफीसर कशी काय काम करणार ? असा सवाल केला जात होता. त्यानंतर वरिष्ठांशी चर्चा करून पूजा नागले यांना राजस्थानात जाऊन कारवाई करण्याची परवानगी दिली गेली.
बैतूलच्या प्रभारी अधिकारी पूजा नागले यांचे रेंजरचे प्रशिक्षण सुरू आहे. या अवैध लाकडांच्या कत्तलीने चिंता व्यक्त केली जात असताना पूजा नागले यांनी हे आव्हान स्वीकारले. सागवान चोरी प्रकरणात दक्षिण वन मंडळाचे प्रभारी डीएफओ वरुण यादव यांनी कारवाईसाठी पथक स्थापन केले. टीमचे नेतृत्व स्वत पूजा यांनी केले. खबऱ्यांना सतर्क केले गेले, त्यानंतर कळले की ज्या ट्रकने लाकूड नेले गेले त्याचा ड्रायव्हर भूरा ऊर्फ विष्णू पिपलोदे आहे. 13 जणांचे पथक 11 मे रोजी बैतूलवरुन निघाले आणि 700 किमीचा पल्ला गाठत राजस्थानातील भिलवाडा येथे पोहचले. 12 मे रोजी हरिपूर गावातील लाकडाच्या वखारीवर छापा टाकला गेला. येथे हे सागवान लाकूड विकण्यात आले होते. तेथून 13 घनमीटर सागवान जप्त केले.
पूजा यांचे सर्वत्र कौतूक
या प्रकरणात लाकडाच्या वखारीचा मालक रामेश्वर सुधार आणि ट्रक ड्रायव्हर भूरा याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील वन माफीया गोकुल बिश्नोई, भजन बिश्नोई आणि दीपक हे तिघे फरार आहेत. हे तिघे हरदा येथील रहीवासी आहेत. भूरा याने सांगितले की जंगलात ज्या झाडांना कापायचे आहे त्यांना खूणा केल्या जातात. त्यानंतर हरदा येथून कुशल मजूर आणून रात्रीच्या रात्री झाडं कापली जातात. या धाडसी कारवाईमुळे पूजा यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
