सांगलीत अनोखी चोरी, सोनसाखळीसोबत शेळ्या-बोकडही चोरले, तरुणाला बेड्या

| Updated on: Oct 08, 2021 | 1:53 PM

इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी, तसेच शेळ्या, बोकड चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास इस्लामपूर पोलिसांकडून सुरु होता. पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत संबंधित आरोपीची माहिती मिळाली होती.

सांगलीत अनोखी चोरी, सोनसाखळीसोबत शेळ्या-बोकडही चोरले, तरुणाला बेड्या
सांगलीत बोकडचोर जेरबंद
Follow us on

सांगली : सांगलीच्या इस्लामपूरमध्ये अट्टल सोनसाखळी आणि बोकड चोरट्याला अटक करण्यात आली आहे. अक्षय शिवाजी पाटील (राहणार सातारा) याला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन लाख रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल हस्तगत करण्यात आली आहे. मात्र आरोपी अक्षय पाटीलचा साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

इस्लामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किरकोळ चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी, तसेच शेळ्या, बोकड चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्याचा तपास इस्लामपूर पोलिसांकडून सुरु होता. पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत संबंधित आरोपीची माहिती मिळाली होती.

त्यानंतर अक्षय शिवाजी पाटील याला ताब्यात घेण्यात आले होते. त्याची कसून चौकशी केली असता इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतून जनावर चोरी आणि विविध ठिकाणी चैन स्नॅचिंग केल्याची कबुली त्याने दिली आहे.

साथीदार फरार

त्याच्याकडून गुन्ह्यातील दोन लाख रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटर सायकल हस्तगत करण्यात आली आहे. त्याचा साथीदार विजय हा फरारी असून त्याचा शोध सुरु आहे. सदर आरोपी यास अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नवी मुंबईत वॉचमनची घरफोडी

दुसरीकडे, 25 लाख रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेलेल्या चार आरोपींपैकी दोघांना अटक करून नवी मुंबईतील एनआरआय कोस्टल पोलिसांनी मोठ्या घरफोडी प्रकरणाचा शोध लावला आहे. आतापर्यंत 21 लाख रुपयांहून अधिक किमतीचा चोरीचा माल आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. हे दोघे नेपाळमध्ये जाणार होते त्याआधी पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिस उपायुक्त (झोन 1) विवेक पानसरे यांनी सांगितले, की सुमारे एक आठवड्यापूर्वी सीवूड्स सेक्टर 44 मधील बालकृष्ण हाऊसिंग सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये चार सुरक्षा रक्षकांनी घरफोडीची योजना आखली होती. तिथे राहणारे जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते. नंदलाल जैन यांच्या घरी डिलिव्हरी बॉय म्हणून गेलेले आरोपी नवीन रतन विश्वकर्मा आणि कामी भक्ता गोरे हे मूळ नेपाळ येथील रहिवाशी आहेत.

25 लाख 19 हजारांचा मुद्देमाल चोरीला

फिर्यादी संदीप जैन यांच्या तक्ररीवरून 24 तासात पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींनी रोख रक्कम आणि सोने-चांदी अशा एकूण 25 लाख 19 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालापैकी 22 लाख 20 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

सीसीटीव्हीचा डीव्हीआर काढला

अधिक चौकशीतून आरोपीविरोधात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात एकूण 6 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून पुढील तपास नवी मुंबई पोलीस करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीने घरफोडी करण्याआधी आणि ओळख पटू नये म्हणून सीसीटीव्ही फूटेजचा डीव्हीआरही काढून घेतले आणि नंतर घरफोडी केली.

दहिसर-पुण्यातून आरोपी अटकेत

डीसीपी (झोन 1) यांच्या मार्गदर्शनाखाली, एसीपी (तुर्भे) गजानन राठोड आणि एनआरआय पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पोलीस पथकाने विविध मार्गांवर काम करून अखेर दोन आरोपी सुरक्षा रक्षकांना दहिसर आणि पुणे येथून अटक केली. नवीन विश्वकर्मा (31) आणि कामी बी गोरे (36) अशी त्यांची नावे आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपींना जैन कुटुंब काही दिवसांसाठी बाहेर जाणार असल्याची पूर्व माहिती होती आणि त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या घरात घुसण्याचा कट रचला गेला. इतर दोन हव्या असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

संबंधित बातम्या :

दारुच्या नशेत 32 वर्षीय तरुणाची पित्याला बेदम मारहाण, औरंगाबादेत वृद्धाचा मृत्यू

सोन्याची चेन घेत ऑनलाईन पैसे पाठवल्याचा बनाव, तोतया आयकर अधिकाऱ्याचा 1.8 लाखांना गंडा

नवी मुंबईत मौजमस्ती करण्यासाठी अल्पवयीन मुलांकडून वाहन चोऱ्या