Nagpur Crime : आई-बाबांना भेटण्यासाठी माहेरी गेली, पण ती शेवटची भेट ठरली! घरी परत आल्यावर ..

पीडित महिला पालकांना भेटण्यासाठी माहेरी गेली होती. मात्र दुसऱ्या दिवशी ती सकाळी घरी परत आली आणि...

Nagpur Crime : आई-बाबांना भेटण्यासाठी माहेरी गेली, पण ती शेवटची भेट ठरली! घरी परत आल्यावर ..
| Updated on: Aug 29, 2023 | 12:17 PM

नागपूर | 29 ऑगस्ट 2023 : आई-वडिलांची भेट घेऊन, निवांत गप्पा मारून आनंदात घरी परत आलेल्या महिलेचा आनंद क्षणभंगूर ठरला. कारण सासरी परत आल्यावर , तिच्या जन्मभराच्या साथीदारानेच तिची हत्या (crime news) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील वाडी पोलिस स्टेशन हद्दीत रविवारी सकाळी ही धक्कादायक घटना घडल्याने, एकच खळबळ माजली आहे. मृत महिला ही पालकांच्या घरून परत आल्यानंतर अवघ्या तासाभरातच हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्रणाली डाहत (वय 34) असे मृत महिलेचे नाव असून ललित डाहत (वय 38) या आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ललित हा शिकारा बार येथे सेक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होता. प्रणाली व ललिता या दोघांचेही दुसरे लग्न होते. प्रणालीने पहिल्या नवऱ्याला घटस्फोट दिला होता तर ललित याचाही पहिल्या पत्नीशी काडीमोड झाल्याची माहिती समोर आली आहे. सहा वर्षांपूर्वी एका देवळात प्रणाली व ललित यांचे लग्न झाले होते. मात्र ललित हा प्रणालीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यांच्यात सतत भांडणं, वाद व्हायचे

त्या दिवशी नेमकं काय झालं ?

25 ऑगस्ट रोजी प्रणाली ही वर्धा येथे तिच्या आई-बाबांना भेटण्यासाठी गेली होती. रविवारी सकाळी आठच्या सुमारास ती नागपूरला (सासरी) परत आली. ललित तिला घेण्यासाठी गेला होता आणि साडेआठच्या सुमारास घरी आले. मात्र त्या दिवशी पुन्हा त्यांच्यात भांडण झाले, ते चांगलेच पेटले. रागाच्या भरात ललितने प्रणालीवर हल्ला केला आणि गळा चिरून तिची हत्या केली. त्यानंतर तो घराला कुलूप लावून बाहेर पडला.

नंतर त्याने एका नातेवाईकाला फोनो लावून केलेल्या कृत्याची कबूली दिली. त्या नातेवाईकाने हत्येची बातमी कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी ललित याला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.