
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर सध्या सगळ्या देशात पाकिस्तान विरुद्ध प्रचंड संतापाची भावना आहे. पाकिस्तानच कोणी समर्थन केलं, तर जनताच त्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवत आहे. असाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान एका व्यक्तीने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा दिली. त्यावर संतापलेल्या जमावाने त्या व्यक्तीला ठेचून मारलं. या प्रकरणात 19 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनी सांगितलं की, 25 पेक्षा जास्त जणांनी मिळून हा हल्ला केला. कर्नाटकच्या मंगळुरुमध्ये भात्रा कल्लुर्ती मंदिराजवळ कुडूपू येथे रविवारी ही घटना घडली. त्या व्यक्तीने मॅच दरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची घोषणा दिली होती, अशी माहिती गृहमंत्री जी परमेश्वरा यांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
लोकांना शांतता आणि संयम बाळगण्याच आवाहन
उर्वरित हल्लेखोरांचा शोध सुरु आहे. 25 पेक्षा जास्त लोक या हल्ल्यात सहभागी होते. “लोक एकत्र जमले आणि त्यांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला” असं जी परमेश्वरा यांनी सांगितलं. तपास सुरु आहे, जी परमेश्वरा यांनी लोकांना शांतता आणि संयम बाळगण्याच आवाहन केलं आहे. मंगळुरु शहराचे पोलीस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, ग्रामीण पोलिसांना सोमवारी संध्याकाळी 5.30 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाला.
लाठया, काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली
रविवारी दुपारी तीनच्या सुमारास भात्रा कल्लुर्ती मंदिराजवळ क्रिकेट सामना सुरु होता. त्यावेळी एका गटाने या व्यक्तीला मारहाण केली. काही प्रत्यक्षदर्शींनी हस्तक्षेप केला, तरीही त्या व्यक्तीला मारहाण सुरु होती. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. तपासातून ही बाब समोर आली आहे. त्याला लाठया, काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.