Tejasvee Ghosalkar : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, तेजस्वी घोसाळकर यांनी दिला राजीनामा, भावनिक पोस्ट करताना लिहिलं नाती बदलू शकतात, पण…
Tejasvee Ghosalkar : "अशावेळी मला केवळ पदाची नव्हे, तर मनापासून, निर्भीडपणे आणि मोकळ्या मनाने साथ देणाऱ्या ताकदीची गरज आहे. हे मला वारंवार जाणवत आहे. मी कधीही असे म्हणणार नाही की, माझा पक्ष किंवा माझे नेते मला ताकद देऊ शकत नाहीत"

मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी ठाकरे गट शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गट शिवसेना पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी मुंबईतील ही मोठी घडामोड आहे. घोसाळकर कुटुंब हे ठाकरे कुटुंबाशी निष्ठावंत मानलं जातं. भाजपच्या मनीषा चौधरी आज दहीसर विधानसभेच्या आमदार आहेत. पण त्यांच्याआधी शिवसेना नेते विनोद घोसाळकर दहिसर विधानसभेचे आमदार होते. तेजस्वी घोसाळकर या त्यांच्या सूनबाई आहेत. तेजस्वी घोसाळकर यांचे पती अभिषेक घोसाळकर यांचं एका दुर्देवी घटनेत निधन झालं होतं. त्याआधी वॉर्ड क्रमांक 1 मधून अभिषेक घोसाळकर 2012 ते 2017 पर्यंत नगरसेवक होते. त्यांच्यानंतर तेजस्वी घोसाळकर 2017 ते आतापर्यंत नगरसेविका होत्या. पण वार्ड क्रमांक 1 साठी आता ओबीसी (OBC) आरक्षण घोषित झालं आहे.
त्यामुळे तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 7 किंवा 8 आणि संधी मिळाली तर वॉर्ड क्रमांक 2 मधूनही निवडणूक लढवू शकतात असं म्हटलं जात होत. पण त्याआधीच त्यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. आज त्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करु शकतात. विनोद घोसाळकर हे मुंबई उपनगरातील ठाकरे गटाचे एक मोठं नेते आहेत. मातोश्रीसोबत त्यांची विशेष जवळीक मानली जाते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारल्यानंतरही विनोद घोसाळकर हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले. पण त्यांच्या सूनेने तेजस्वी घोसाळकर यांनी वेगळा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
अपार अडचणींचा सामना करावा लागतोय
ठाकरे गट शिवसेना सदस्यत्वाचा राजीनामा देत असताना तेजस्वी घोसाळकर यांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. “आज आपल्याशी संवाद साधताना माझं मन प्रचंड उद्गिग्न झालं आहे. आयुष्यात असा क्षण कधी येईल आणि असे शब्द लिहावे लागतील, याची कल्पनाही मी कधी केली नव्हती. आज मन जड आहे…शब्द अपुरे पडत आहेत…पण तरीही हा संवाद आवश्यक आहे” असं तेजस्वी घोसाळकर यांनी लिहिलं आहे. “आज राजकारण करताना, जनतेसाठी काम करताना आणि माझ्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना मला अपार अडचणींचा सामना करावा लागत आहे” असं तेजस्वी घोसाळकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
नाती बदलू शकतात, पण ऋणानुबंध नाहीत… वेदनेतून घेतलेला निर्णयही प्रामाणिकतेशी तडजोड करत नाही !
जय महाराष्ट्र pic.twitter.com/HS5lsAs1Q7
— Tejasvee Abhishek Ghosalkar (@tejasvee27) December 15, 2025
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती
भाजपमध्ये येण्यापूर्वी तेजस्वी घोसाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि दोघांमध्ये चर्चा झाली होती. बीएमसी निवडणुकीपूर्वी तेजस्वी यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. तेजस्वी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
