फॅक्ट्री वर्कर राज, रॅपिडोवाला विशाल अन् बेरोजगार आकाश..; राजा रघुवंशीच्या हत्येत कोणी का दिली सोनमला साथ?
राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी पत्नी सोनमला अटक केल्यानंतर पोलिसांनी आता इतर चार तरुणांनाही बेड्या ठोकल्या आहेत. त्यापैकी राज कुशवाह हा सोनमचा प्रियकर होता, तर इतर तिघांना पैशांचं आमिष दाखवून राजाच्या हत्येच्या कटात सहभागी करून घेण्यात आलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मध्य प्रदेशातील इंदूर इथल्या राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी पत्नी सोनम रघुवंशीला पोलिसांनी अटक केली. मेघालयात हनिमूनसाठी गेलेलं हे जोडपं काही दिवसांपासून बेपत्ता होतं. त्यानंतर पोलिसांना राजाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणात सोमवारी मोठे अपडेट्स समोर आले. सर्वांत आधी गाझीपूरमधील एका ढाब्याजवळ पोलिसांना सोनम सापडली. त्यानंतर तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली. याशिवाय इतर चार तरुणांनाही अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान याप्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेतलेल्या चार तरुणांपैकी एकासोबत सोनमचं प्रेमसंबंध होतं. म्हणूनच ती तिच्या पतीला हनिमूनच्या बहाण्याने मेघालयला घेऊन गेली आणि तिथे त्याची हत्या केली. मेघालयमधील गाईडनेही चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितलं होतं की सोनम आणि राजासोबत चार तरुण होते. दरम्यान सोनमसोबत असलेले हे चार तरुण कोण होते, त्यांनी राजा रघुवंशीच्या हत्येत सोनमची का साथ दिली, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. सोनमसोबत असलेल्या चार तरुणांची नावं राज कुशवाह, विशाल चौहान, आकाश आणि आनंद अशी आहेत.
राज कुशवाह- राज हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून काही वर्षांपूर्वी तो इंदूरमध्ये राहायला आला होता. आधी तो गोविंद नगरमध्ये भाड्याने राह होता. नंतर त्याला सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर तो बाणगंगाजवळ भाड्याच्या घरात राहू लागला होता. सुरुवातीला त्याची आईसुद्धा त्याच्यासोबत राहत होती. परंतु नंतर ती उत्तर प्रदेशला राहायला गेली. सोनम आणि राज कुशवाहचं प्रेमसंबंध सुरू होऊन वर्षही झालं नाही.




विशाल चौहान- विशाल हा राज कुशवाहच्या शेजारी राहतो आणि तो राजचा चांगला मित्र आहे. विशाल हा रॅपिडो बाईक चालवतो आणि त्याच्या कुटुंबीयांसह राहतो.
आकाश राजपूत- इंदूरच्या बाहेरून पकडलेला तिसरा आरोपी आकाश राजपूत हा बेरोजगार आहे. तोसुद्धा राजच्याच परिसरात राहत होता. त्यामुळे तो राजला चांगलंच ओळखत होता. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजचे दोन्ही मित्र आकाश आणि विशाल हे गरीब कुटुंबातून आले आहेत. याचाच फायदा घेत सोनमने त्यांना पैशांचं आमिष दाखवून राजा रघुवंशीच्या हत्येच्या कटात सहभागी करून घेतलं. सोनमने राजाच्या हत्येच्या बदल्यात त्यांना सुमारे 10 लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं.
आनंद- चौथा आरोपी आनंद हा देखील इतर दोघांप्रमाणेच कॉन्ट्रॅक्ट किलर होता. राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीमुळे सोनमवरील संशय अधिकच वाढला आहे. त्यामुळे मेघालय पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.