छेडछाड करत भर रस्त्यात तरुणीचे कपडे फाडले, औरंगाबादमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

| Updated on: Aug 28, 2021 | 3:01 PM

औरंगाबादमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी गेटजवळ भर दिवसा रस्त्यावरच एका महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. महिलेला रिक्षातून उतरवत छेडछाड करणे आणि कपडे फाडण्यापर्यंत आरोपींची मजल गेली.

छेडछाड करत भर रस्त्यात तरुणीचे कपडे फाडले, औरंगाबादमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. औरंगाबादच्या वाळूज परिसरात बजाज कंपनी गेटजवळ भर दिवसा रस्त्यावरच एका महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. महिलेला रिक्षातून उतरवत छेडछाड करणे आणि कपडे फाडण्यापर्यंत आरोपींची मजल गेली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक आहे की नाही? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

आरोपींनी महिलेची छेडछाड करत कपडे फाडल्यानंतर रस्त्यावरील नागरिक मदतीला धावून आले. त्यांनी या विवस्त्र महिलेला स्वतःचे कपडे दिले. आरोपींनी पीडित महिलेचे कपडे फाडून जबर मारहाण केली. तसेच या महिलेच्या शरीरावर चावाही घेतला.

औरंगाबादमधील अन्य एका घटनेत छेडछाडीच्या भीतीने तरुणीची रिक्षातून उडी

औरंगाबाद शहरातील ही सलग दुसरी घटना आहे. या घटनेच्या अगदी काही वेळापूर्वीच छेडछाडीच्या भीतीने एका तरुणीने चालू रिक्षातून उडी मारल्याची घटना घडली होती.

औरंगाबादमध्ये शनिवारी (28 ऑगस्ट) भर दिवसा, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हा प्रकार घडला. शहरातील मोंढा नाका ते आकाशवाणी चौक चौकादरम्यान ही तरुणी रिक्षात बसली. संबंधित चालकाने रिक्षा सुरू केली. पण काही अंतरावर गेल्यावर तिला चालकाच्या हावभावावर शंका आली. रिक्षात एकटीच असल्याने तरुणी प्रचंड घाबरली.

थांबवायला सांगितले तरीही वेग वाढवला

रिक्षा चालकाचे हावभाव बदलल्यावर तरुणीनं तत्काळ तो रिक्षा बाजूला घेऊन थांबवायला सांगितले. मात्र तिचे काहीही न ऐकता रिक्षा चालकानं आणखीच वेगानं रिक्षा चालवायला सुरुवात केली. अखेर छेडछाड किंवा अपहरणाच्या भीतीनं धावत्या रिक्षातून उडी मारली. या प्रकरात तरुणी गंभीर जखमी झाली.

या घटनांमुळे नागरिकांमध्ये महिला सुरक्षेच्या प्रश्नावर भीती तयार झालीय. गुन्हेगार भरदिवसा महिलांवर हल्ला करत असल्यानं महिलांनी घराबाहेर पडायचं की नाही? असा प्रश्न तयार झालाय. पोलीस प्रशासनांचा गुन्हेगारांवर वचक नाही. गुन्हेगार मोकाट बाहेर फिरत असल्यानंच सर्वसामान्य नागरिकांचं घराबाहेर पडणं मुश्किल झाल्याचीही संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

धीट व्हा, पोलिसांना फोन करा!

शिक्षण किंवा नोकरी-कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुलींना अनेकदा छेडछाडीच्या प्रकारांना सामोरे जावे लागते. कोणावरही कोणताही प्रसंग ओढवू शकतो. अशा वेळी घाबरून न जाता, तरुणींनी सतर्कतेने पोलिसांना फोन करणे, हा उत्तम मार्ग असल्याचे आश्वासन दामिनी पथकाच्या प्रमुख निर्मला निंभोरे यांनी दिले. शहरात सर्व प्रमुख ठिकाणी, दूध डेअरी चौक, क्रांती चौक, आकाशवाणी चौक, गुलमंडी इत्यादी भागात पोलिसांची वाहनं फिरत असतात. त्यामुळे घटनास्थळी पोलिस अगदी दोन मिनिटात दाखल होऊ शकतात. फक्त संकटात सापडलेल्या व्यक्तींनी पोलिसांना एक फोन केला पाहिजे, अशी विनंती निर्मला निंभोरे यांनी केली.

हेल्पलाईन नंबर सेव्ह करा – 0240-2240500

शहरातील संकटातील व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक किंवा महिलांना कधीही पोलिसांची मदत लागल्यास त्यांनी तत्काळ 0240-2240500 हा क्रमांक डायल करून कंट्रोल रुमला माहिती दिली पाहिजे. कंट्रोल रुमवरून संबंधित परिसरात ड्युटीवर असलेल्या पोलिसांना मदतीसाठी पाठवले जाते. त्यामुळे आपण फोन केल्यावर पोलिस कधी येतील आणि कधी मदत मिळेल, या विचारात न राहता, संकटातील व्यक्तींना तत्काळ फोन केला पाहिजे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता दामिनी पथकाचे 1090, 1091 हे हेल्पलाइन नंबरही आहेत.

हेही वाचा :

रिक्षात बसल्यावर चालकाचे बदलले हावभाव, छेडछाडीच्या भीतीने तरुणीने धावत्या रिक्षातून मारली उडी

पुण्यात 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून अत्याचार, पोलिसांनी दरवाजा तोडून चौघांना रंगेहाथ पकडलं

रडत-रडत सुसाईड VIDEO काढला, छळाची ‘आपबिती’ सांगितली, ठाण्यात महिलेची आत्महत्या

व्हिडीओ पाहा :

Molestation and Attack on women in Aurangabad