शाहरुख खानसोबत भेट घडवून देण्याचा बहाणा, दादर स्थानकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण, पोलिसांनी कसं सोडवलं ?

| Updated on: Jul 22, 2021 | 12:19 AM

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याची भेट करुन देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या 43 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबईच्या रेल्वे पोलिसांना यश आलं आहे.

शाहरुख खानसोबत भेट घडवून देण्याचा बहाणा, दादर स्थानकावर अल्पवयीन मुलीचं अपहरण, पोलिसांनी कसं सोडवलं ?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याची भेट करुन देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचं अपहरण करणाऱ्या 43 वर्षीय आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबईच्या रेल्वे पोलिसांना यश आलं आहे. दादर जीआरपीने मोठ्या शिताफीने पीडतेला आरोपीच्या तावडीतून सुखरुप सोडवले. संबंधित आरोपीचं नाव सुभान शेख असं आहे. त्याने फेसबुकवर पीडित तरुणीसोबत ओळख निर्माण केली होती.

नेमकं प्रकरण काय?

दादर जीआरपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुभान शेख आणि पीडित मुलगी यांची ओळख एक वर्षाआधी फेसबुकवर झाली होती. आरोपीने फेसबुक अकाउंटवर 20 वर्षीय तरुणाचे फोटो लावले होते. त्याचबरोबर त्याने आपल्या प्रोफाईलमध्ये मोठमोठ्या कलाकारांसोबतचे फोटो शेअर केले होते. ओळख झाल्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि आरोपी दोघांनी फेसबुकवर चॅटिंग करायला सुरुवात केली. यातून दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आरोपीने स्वत:ला इव्हेंट मॅनेजर असल्याचे सांगितले होते. यादरम्यान आरोपीने मुलीला शाहरुख खान सोबत भेटणार का? असं विचारले. त्यावर मुलीने होकार दिला.

मुलगी ट्रेनने मुंबईला निघाली

पीडित मुलगी ही आपल्या परिवारासोबत कोलकाताहून दीडशे किलोमीटर लांब पळशीपरामध्ये राहते. तर आरोपी सुभान शेख हा मुंबईच्या मिरा रोड येथे राहतो. मुलगी 15 जुलैला जेव्हा घरी आली नाही तेव्हा तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तपासासाठी सीसीटीव्हीचा आधार घेतला. यावेळी मुलगी ही मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दादर जीपीआरपीला संपर्क साधला. त्यानंतर दादर स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी तातडीने कोलकाताहून आलेल्या रेल्वे बघण्यास सुरुवात केली. या दरम्यान दादर जीआरपीला 17 जुलैच्या सकाळी मुंबई हावडा ट्रैनमधून उतरलेल्या पीडितेला शोधण्यात यश आलं.

रेल्वे पोलिसांनी मुलीची सुटका कशी केली?

आरोपीने मुलीला फेसबुकवर मेसेज केला होता की तो कामामध्ये व्यस्त असल्यामुळे तो आपल्या वडिलांना रेल्वे स्टेशनवर घेण्यासाठी पाठवत आहे. त्यानंतर आरोपी तिला घेण्यासाठी दादर रेल्वे स्टेशनवर पोहोचला. आरोपीने मुलीला भेटल्यानंतर तिच्या मोबाईलचं सीमकार्ड तोडलं. पण रेल्वे पोलिसांनी आरोपीला बरोबर हेरलं. त्यानंतर अल्पवयीन मुलीला त्याच्या तावडीतून सुखरुप सोडवलं. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा :

जात पंचायतीकडून कुटुंबावर बहिष्कार, महिलेची पोलिसात तक्रार, आरोपींची लाथाबुक्क्यांनी मारहाण

खूप जीव लावला, घरातील सदस्यासारखं वागवलं, पण मोलकरणीकडून तरीही विश्वासघात, दागिन्यांवर डल्ला