वाद विकोपाला पोहोचला, अध्यक्षाने सदस्याचा अंगठा कापला; मुंबईतील धक्कादायक घटना

आदित्य देसाई आणि नित्यानंद परिहार यांच्यातील वाद कशामुळे सुरु झाला? नित्यानंद परिहार यांनी खरंच आदित्य देसाईंचा अंगठा कापला का? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

वाद विकोपाला पोहोचला, अध्यक्षाने सदस्याचा अंगठा कापला; मुंबईतील धक्कादायक घटना
| Edited By: | Updated on: Aug 04, 2024 | 3:51 PM

Dahisar Society Chairman Cut Member Finger : एका सोसायटीच्या मीटिंगमध्ये झालेल्या किरकोळ वादात अध्यक्षाने सदस्याचा अंगठा कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई उपनगरातील दहिसर परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात सर्वत्र खळबळ उडाली आहे. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दहिसर पश्चिमेकडील म्हात्रे वाडी या ठिकाणी अमरनाथ अपार्टमेंट आहे. या अपोर्टमेंटमध्ये आज सकाळी सोसायटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला सोसायटीमधील अनेक सदस्य उपस्थित होते. ही बैठक सुरु असताना सोसायटीचे सदस्य आदित्य देसाई यांचा सोसायटीचे अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्याशी वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की सोसायटीचे अध्यक्ष असलेल्या नित्यानंद परिहार यांनी सोसायटीचे सदस्य आदित्य देसाई यांचा अंगठा कापला.

आदित्य देसाई यांची प्रतिक्रिया

आदित्य देसाईने सोसायटीचे अध्यक्ष नित्यानंद परिहार यांच्यावर अंगठा कापल्याचा आरोप केला आहे. “आज 11 वाजता दहिसर पश्चिमेकडील म्हात्रे वाडी या ठिकाणी असलेल्या अमरनाथ अपार्टमेंटमध्ये सोसायटीची मीटिंग होती. या मीटिंगमध्ये सोसायटीच्या काही विषयांवर चर्चा होणार होती. मी तिथे गेलो आणि सोसायटीच्या अध्यक्षांना पत्रक दिलं. ते मला उलटसुलट बोलायला लागले. त्यानंतर मग मी पण त्यांना सुनावलं. यानंतर त्याने मला धक्का दिला आणि खाली पाडलं. यानंतर तो माझ्या अंगावर बसला. माझा चष्मा फोडला. मी त्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर माझा अंगठा त्याच्या तोंडात गेला आणि त्याने तो चावला. यामुळे अंगठ्याचे दोन तुकडे झाले. मला खूप वेदना होत आहेत”, अशी प्रतिक्रिया सोसायटीचे सदस्य आदित्य देसाई यांनी दिली आहे.

पोलीस तपास सुरु

दरम्यान या सोसायटीच्या मीटिंगमध्ये नेमकं काय घडलं? आदित्य देसाई आणि नित्यानंद परिहार यांच्यातील वाद कशामुळे सुरु झाला? नित्यानंद परिहार यांनी खरंच आदित्य देसाईंचा अंगठा कापला का? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सध्या या प्रकरणी एमएचबी पोलीस तपास करत आहेत.