मुंबईत दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, तीन वर्षांच्या बालकासह पाच जण जखमी

| Updated on: Nov 01, 2021 | 12:31 PM

भायखळा येथील जे जे मार्गावरील कॅफे पॅराडाईजजवळील खाडिया रस्त्यावर असलेली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) ही 18 मजली इमारत आहे, लिफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे लिफ्ट दहाव्या मजल्यावरून थेट खाली पडली.

मुंबईत दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, तीन वर्षांच्या बालकासह पाच जण जखमी
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

मुंबई : मुंबईत लिफ्ट कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले आहेत. शनिवारी उशिरा जेजे रुग्णालयाजवळील गुलमोहर टेरेस इमारतीमध्ये लिफ्ट कोसळून अपघात झाला. रात्री 11 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांसह पाच जण लिफ्ट वापरत असताना ही घटना घडली. यामध्ये तीन वर्षांच्या बालकाचाही समावेश आहे.

काय आहे प्रकरण?

भायखळा येथील जे जे मार्गावरील कॅफे पॅराडाईजजवळील खाडिया रस्त्यावर असलेली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) ही 18 मजली इमारत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.  मुंबई अग्निशमन दलाचे स्टेशन ऑफिसर एम वरणकर म्हणाले की, “लिफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे लिफ्ट दहाव्या मजल्यावरून थेट खाली पडली.”

घटनेनंतर लगेचच इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन दल आणि मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली, त्यांनी घटनास्थळी जाऊन अडकलेल्या रहिवाशांची सुटका केली.

पाच जण जखमी, प्रकृती स्थिर

हुमा खान (24), अर्शा खान (7), सोहन कादरी (3), निलोफर रिझवान शेख (36) आणि शाहीन खान (45) अशी पाच जखमींची नावे आहेत. त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यापैकी एकाला डिस्चार्ज दिल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.

अजूनही जेजे रुग्णालयात दाखल असलेल्या चौघा रुग्णांपैकी एक असलेल्या शाहीनच्या दोन्ही पायांमध्ये फ्रॅक्चर आहे. त्यावर रविवारी शस्त्रक्रिया करण्यात आली, अशी माहिती जे जे रुग्णालयातील ऑर्थोपेडिक विभागातील डॉ. नादिर शाह यांनी दिली. त्यांच्या देखरेखीखाली सर्व जखमी रहिवाशांवर उपचार केले जात आहेत. “आम्ही शाहीनचे ऑपरेशन केले. फ्रॅक्चर ठीक करण्यासाठी सोमवारी सकाळी आणखी दोघांवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.” अशी माहितीही डॉक्टरांनी दिली.

लिफ्ट दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल

जेजे मार्ग पोलिसांनी भादंवि कलम 287 (मशिनरीच्या बाबतीत निष्काळजीपणा) आणि 338 (इतरांच्या जीवाला किंवा वैयक्तिक सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कृत्यामुळे गंभीर दुखापत करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

वरळीत लिफ्ट पडून पाच मजुरांचा मृत्यू

काही महिन्यांपूर्वी वरळीतील हनुमान गल्लीत बीडीडी चाळ नंबर 118, 119 च्या समोर असलेल्या ललित अंबिका या निर्माणाधीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळून चौघा मजुरांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या एकाने उपचारादरम्यान प्राण गमावले होते. या प्रकरणी कंत्राटदार आणि सुपरवायझर यांच्यावर गुन्हा नोंदवून बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.

संबंधित बातम्या :

वरळी लिफ्ट दुर्घटना, पाच मजुरांच्या मृत्यू प्रकरणी दोघा जणांना अटक

लिफ्टचा दरवाजा आणि ग्रीलमध्ये अडकून चिमुरड्याचा मृत्यू, धारावीतील धक्कादायक घटना