रामजी, ज्यादा दिमाग मत चला, तेरी जनम कुंडली… मुंबईतल्या प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याला धमकी, नंतर गोळीबार

मुंबईतील प्रसिद्ध पी.सी. जैन ज्वेलर्सचे मालक भरत जैन यांना 10 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमक्या मिळाल्या होत्या. यानंतर त्यांच्या माहिम येथील दुकानावर गोळीबार झाला, ज्यामुळे खळबळ उडाली आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या हल्लेखोरांनी 2-3 गोळ्या झाडल्या. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

रामजी, ज्यादा दिमाग मत चला, तेरी जनम कुंडली... मुंबईतल्या प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याला धमकी, नंतर गोळीबार
P.C. Jain jewellers
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2026 | 1:18 PM

माहिममधील प्रसिद्ध ज्वेलर्स पीसी जैन ज्वेलर्सचे मालक भरत जैन यांच्या दुकानावर गोळीबार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. जैन यांना 10 कोटींच्या खंडणीसाठी धमकी आली होती. त्याबद्दल त्यांनी पोलिसात एफआयआरही नोंदवला होता. मात्र, गोळीबार झाल्याने सर्वचजण हादरून गेले आहे. रामजी, ज्यादा दिमाग मत चला, तेरी जनम कुंडली मेरे पास है. पैसा तयार रखना, अशी शेवटची धमकी भरत जैन यांना देण्यात आली होती. तसा खुलासाच एफआयरमधून झाला आहे.

रामजी ज्यादा दिमाग मत चला, तेरी जन्म कुंडली मेरे पास है. झेड प्लस सिक्युरिटी लगा बी रख, पैसा तुझे देना होगा. यमराज जी को देखना, 10 करोड देना होगा, असा मेसेज भरत जैन यांना 31 ऑक्टोबर रोजी आला होता. हा शेवटचा धमकीचा मेसेज होता. जैन यांना पहिला मेसेज 18 ऑक्टोबर, दुसरा 24 ऑक्टोबरला आणि त्यानंतर शेवटची धमकी 31 ऑक्टोबरला आली होती, अशी धक्कादायक माहिती एफआयआरमधून उघड झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Loading...

रेडी रखना चमत्कार…

भरत जैन यांना 18 ऑक्टोबरला पहिली धमकी आली होती. ही धमकी अनोळखी नंबरवरून आली होती. सुरुवातीला भरत जैन यांनी मेसेज स्पॅम असावा म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र संध्याकाळी त्यांना गोळी मारण्याची मेसेजद्वारे धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाील होती. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा धमकीचा मेसेज आला होता. रेडी रखना चमत्कार छाया… असा धमकीचा मेसेज आला होता. एकूण तीनवेळा त्यांना धमक्यांचा मेसेज आला होता.

असा झाला हल्ला

25 नोव्हेंबर रोजी म्हणजे काल रात्री साडेसातच्या सुमारास त्यांच्या दुकानावर गोळीबार करण्यात आला. भरत जैन सकाळी 10 वाजता दुकानात आले होते. दुपारी परत जेवणासाठी घरी गेले. त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता परत दुकानात आले. रात्री साडेसातच्या सुमारास भरत जैन दुकानात बसलेले होते. कर्मचारी नामदेव गुरु आणि सुधाकर हे देखील दुकानातच होते. याचवेळी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दोन तरुण दुकानाबाहेरील फुटपाथवर आले. त्यांनी 2 ते 3 राऊंड फायरिंग केली होती. गोळीबारात दुकानाच्या काचेच्या दरवाजाचे नुकसान झाले. सीसीटीव्हीत हे आरोपी आणि दुचाकी कैद झाली आहे. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील दुकानदार आणि नागरिक घटनास्थळी जमा झाले. आरोपींनी खंडणी वसूल करण्यासाठी कट रचून जीवघेणा हल्ला केल्याचा भरत जैन यांचा आरोप आहे.

सीसीटीव्हीत तपासले

भरत जैन यांनी हल्ल्यानंतर स्वतःच्या दुकानातील आणि शेजारील दुकानातील CCTV फुटेज तपासले. यावेळी CCTV मध्ये आरोपींच्या मोटारसायकलचा नंबर MH 15 AJ 3565 दिसून आला. दुचाकी चालवणारा आरोपी अंदाजे 20 ते 25 वर्षांचा, उंची 5 फूट 6 इंच, मध्यम बांधा, काळी जॅकेट, काळी पँट, चेहऱ्यावर काळा मास्क आणि डोक्यावर टोपी घातलेला दिसला. मागे बसलेला आरोपी अंदाजे 20 ते 25 वर्षांचा, उंची 5 फूट 8 इंच, सडपातळ बांधा, काळी जॅकेट, निळी जीन्स आणि हेल्मेट घातलेले होते. दोन्ही आरोपींना पुन्हा पाहिल्यास ओळखू शकतो, असे भरत जैन यांनी पोलिसांना सांगितले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us