NCB अधिकारी वानखडेंच्याविरोधात कारवाई करा, राष्ट्रवादीच्या मागणीवर आता NCB चं उत्तर

| Updated on: Oct 09, 2021 | 4:32 PM

एनसीबीने एकही नियम मोडलेला नाही. गुप्त माहितीच्या आधारे ती कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांना सोडल्याचा आरोप खोटा आहे, असा खुलासा एनसीबीचे डेप्युटी डीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केला.

NCB अधिकारी वानखडेंच्याविरोधात कारवाई करा, राष्ट्रवादीच्या मागणीवर आता NCB चं उत्तर
NCB अधिकारी वानखडेंच्याविरोधात कारवाई करा, राष्ट्रवादीच्या मागणीवर आता NCB चं उत्तर
Follow us on

मुंबई : क्रूज ड्रग्स प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना आज अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) उत्तर दिले. नवाब मलिक यांनी एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. क्रूजवर 2 ऑक्टोबरला टाकलेला छापा आणि कारवाई ही नियमांनुसारच होती. छाप्यादरम्यान 16 जणांना ताब्यात घेतले होते. चौकशीनंतर पुराव्याच्या आधारे त्यातील आठ जणांना अटक केली होती, तर इतरांना सोडण्यात आले होते. एनसीबीने एकही नियम मोडलेला नाही. गुप्त माहितीच्या आधारे ती कारवाई करण्यात आली. भाजप नेत्यांना सोडल्याचा आरोप खोटा आहे, असा खुलासा एनसीबीचे डेप्युटी डीजी ज्ञानेश्वर सिंह यांनी पत्रकार परिषदेत केला. (Take action against NCB officer Wankhade, now NCB’s reply to NCP’s demand)

एनसीबी एक जबाबदार यंत्रणा!

आमचे सर्व ऑपरेशन वास्तविक वेळेच्या आधारे असते. त्यामुळे पुरावे गोळा करणे कठीण असते. या प्रक्रियेत एकूण नऊ साक्षीदार सहभागी झाले. त्यात मनिष भानुशाली आणि के. पी. गोसावी हेदेखील होते. या सर्व साक्षीदारांना दोन तारखेच्या ऑपरेशनआधी एनसीबी ओळखत नव्हती. या ऑपरेशन दरम्यान ज्या लोकांना अटक करण्यात आले होते. त्यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांना एनसीबी कार्यालयात आणले गेले. हे जे नाव तुम्ही घेताय? त्याबाबत सध्या तपास सुरु असल्यामुळे कुठलेही नाव घेणे योग्य होणार नाही. आम्ही एक जबाबदार यंत्रणा आहोत आणि कुठलेही लूज कमेंट करत नाहीत. आम्ही पेपरवर जे आहे, त्यावर बोलतो. जे पुरावे आहेत, त्यावर बोलतो. बाकी नाही, असेही पत्रकार परिषदेत एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले.

एनसीबीचे प्रामाणिक काम सुरु

एनसीबी खूप प्रामाणिक काम करत आहे. संपूर्ण देशात एनसीबी ड्रग्सच्या विरोधात पारदर्शी कारवाया करत आहे. लोकांच्या माहितीवर आम्ही कारवाई करतोय. अशाच माहितीच्या आधारे कार्डेलिया क्रूझवर कारवाई केली. यावेळी अनेक प्रकारचे ड्रग्स सापडले तसेच सुमारे 1 लाख 30 हजार रोकड सापडली. याचे 9 साक्षीदार आहेत. गोसावी आणि भानुशाली हेदेखील साक्षीदार आहेत. कुणाला बेकायदेशीर वागणूक दिली नाही. 14 लोकांना एनसीबी कार्यलयात आणले होते. त्याचा अधिक तपास करून त्यांचा जबाब नोंदवला. त्यातील 8 लोकांना अटक केली आणि 6 लोकांना सोडून दिले.

लवकरच आरोपपत्र दाखल करू

पंचनाम्यात सर्व मुद्दे आले आहेत. लवकरच आरोपपत्र दाखल करू. आम्ही ज्या 8 लोकांना क्रूझवर अटक केली, ते सध्या तुरुंगात आहेत. बाकी 10 लोकही न्यायालयीन कोठडीत आहेत. 6 फॉलोअप रेड केल्या आहेत. 10 लोकांना अटक केली आहे, त्यात एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे. त्यांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्स जप्त केले आहे. हे ड्रग्स तरुणांना व्यसन लावत होते. आमच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. खोटे आहेत. आम्ही एक निष्पक्ष यंत्रणा आहोत. आम्ही देशाला नशामुक्त करण्याचे काम करतो, असे एनसीबीने म्हटले आहे.

आम्ही आमची माहिती आणि लोकांच्या माहितीच्या आधारावर काम करतो. आम्हाला अशाचप्रकारे मिळालेल्या माहितीच्या आधारावर आम्ही 2 ऑक्टोबर रोजी क्रूझवर कारवाई केली. आमच्या पद्धतीनुसार आम्हाला 2 साक्षीदार नेमावे लागतात. यावेळी आम्हाला तात्काळ जायचे असते. त्यांचा पूर्व इतिहास तपासणे शक्य नसते. मनीष भानुशाली, गोसावी यांच्याबाबत एनसीबीला काही माहिती नव्हती. कारवाईच्या दरम्यान त्याठिकाणी प्रचंड गर्दी होती. त्यात ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना आणण्यात आले. आम्ही 14 जणांना एनसीबी कार्यलयात आणले होते. कायद्यानुसार त्यांचे जबाब घेण्यात आले. कोठडीत रवानगी झालेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे आणखी 6 ठिकाणी आम्ही कारवाई केली आहे. हे एक मोठे नेटवर्क आहे. हे आपल्या तरुणांना बरबाद करत आहेत. आमची कारवाई सुरूच राहणार आहे, असाही दावा एनसीबीने केला आहे. (Take action against NCB officer Wankhade, now NCB’s reply to NCP’s demand)

इतर बातम्या

भाजप नेत्याच्या मेहुण्याला एनसीबीनं का सोडलं, अधिकारी म्हणतात, जाती, धर्माच्या आधारावर काम करत नाही!

Shah Rukh Khan : NCB ने फास आणखी आवळला, आता शाहरुख खानच्या ड्रायव्हरला समन्स धाडलं!