पोलीस असल्याचे भासवून वृद्धांना फसवायचा, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच !

जेष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या भामट्यांचा सध्या सुळसुळाट झाला आहे. जेष्ठ नागरिकांना बतावण्या करुन लुटण्याचे प्रकार वाढले आहेत.

पोलीस असल्याचे भासवून वृद्धांना फसवायचा, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच !
जेष्ठ नागरिकांना लुटणारा भामटा अटक
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 11, 2023 | 5:57 PM

मुंबई : हल्ली जेष्ठ नागरिकांना टार्गेट करुन लुटण्याचे प्रमाण वाढले आहेत. एकट्या जाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना हेरतात आणि बतावण्या करुन लुटतात. पोलीस असल्याची बतावणी करुन जेष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. संजय दत्ताराम मांगडे असे आरोपीचे नाव आहे. माहीम मच्छिमार कॉलनी येथून आरोपीला अटक केली. बनावट पोलीस असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी 50 हून अधिक गुन्हे आरोपीवर मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला अटक

कस्तुरबा पोलीस ठाण्याअंतर्गत एका वृद्ध व्यक्तीकडून 20 ग्रॅम सोने आणि रोख रक्कम लुटल्याची घटना 24 जून रोजी घडली होती. यानंतर जेष्ठ नागरिकाच्या फिर्यादीवरुन कस्तुरबा पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी माहिममधील मच्छिमार कॉलनीतून आरोपीला अटक केली आहे.

काय आहे मोडस ऑपरेंडी?

जेष्ठ नागरिकांना हेरायचा आणि पोलीस असल्याची बतावणी करायचा. मग पुढे हत्या झाली आहे. त्यामुळे तपासणी सुरु आहे. तुमचे दागिने रुमालात ठेवा सांगायचा. मग हातचलाखीने दगड असलेला रुमाल नागरिकांच्या हातात देऊन पसार व्हायचा. अखेर या आरोपीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले आहे.

नंदुरबारमध्येही फसवणूक करणारी टोळी जेरबंद

जेष्ठ नागरिकांनी हेरुन सोन्याच्या वस्तू आणि पैसे लंपास करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे ही गँग साधूच्या वेशात रुद्राक्ष विकायची. अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्याने जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शहर पोलीस यांना ठोस कारवाई करत या घटना रोखण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांनी सदर परिसरात पाळत ठेवून आरोपींना बेड्या ठोकल्या.