Mumbai Crime : मध्यरात्री बसून पत्ते खेळत होते, तेवढ्यात पोलिस आले, पळापळ झाली आणि …

मध्यरात्री पत्ते खेळणाऱ्या काही लोकांवर पोलिसांनी छापा टाकला. यामुळे एकच पळापळ झाली आणि एक तरूण अचानक खाली कोसळला.

Mumbai Crime : मध्यरात्री बसून पत्ते खेळत होते, तेवढ्यात पोलिस आले, पळापळ झाली आणि ...
| Updated on: Sep 23, 2023 | 1:26 PM

विरार | 23 सप्टेंबर 2023 : सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची (ganesh utsaw) धूम सुरू आहे. घरगुती गणपतींसोबतच अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील सणाचा उत्साह दिसत आहे. मात्र या सणाला गालबोट लावणारी एक घटना विरारमध्ये घडली आहे. गणेश मंडळा समोर बसून काही जण मध्यरात्री पत्ते खेळत होते, अचानक पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे ( police raid) एकच पळापळ झाली. त्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विरार पश्चिमेकडे असलेल्या एका गावात ही दुर्दैवी घटना घडली.

विरार पश्चिम आगाशी-कोल्हापूर या गावात मध्येरात्री पावणे तीनच्या सुमारास कोल्हापूर ग्रामस्थ मंडळात ही घटना घडली आहे. गणेश मंडळाच्या समोर काही गणेश भक्त पत्ते खेळत बसले होते. ही माहिती मिळताच मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास अर्नाळा पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यातून वाचण्यासाठी आणि पोलिसांच्या भीतीने सर्वजण उठून पळू लागले. यादरम्यान पळता पळता चेंगराचेंगरी झाली.

त्यावेळी पळता पळता 19 वर्षांचा एका तरूण पळताना भीतीने खाली कोसळला. गावकऱ्यांनी त्याला तातडीने उपचारांसाठी संजीवनी रुग्णालयात दाखल केले.मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हृदयाविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्या तरूणाचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे, त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकेल. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.