नागपुरातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू या कारणाने, पोलीस आयुक्तांनी दिली ही मोठी माहिती

गाडी नादुरुस्त होती. कारचा आतून दार उघडत नव्हतं. त्यामुळे गुदमरुन मुलांचा मृत्यू झालाय. मुलांच्या शरिरावर कुठलीही इजा नाही.

नागपुरातील तीन चिमुकल्यांचा मृत्यू या कारणाने, पोलीस आयुक्तांनी दिली ही मोठी माहिती
| Updated on: Jun 19, 2023 | 4:31 PM

गजानन उमाटे, प्रतिनिधी, नागपूर : परवा तीन मुलं बेपत्ता झाली होती. मुलांचा शोध घेण्यासाठी भरपूर सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावरून मुलं बाहेर गेली नाही असं कळलं. त्यानंतर त्या मुलांच्या घराच्या परिसरात कोंबिंग ॲापरेशन राबवलं. त्यात मुलांचा कारमध्ये मृतदेह आढळून आलाय. गाडी नादुरुस्त होती. कारचा आतून दार उघडत नव्हतं. त्यामुळे गुदमरुन मुलांचा मृत्यू झालाय. मुलांच्या शरिरावर कुठलीही इजा नाही. शवविच्छेदनाचा अंतिम रिपोर्ट आल्यावर कळेल. पण यात कुठलाही घातपात वाटत नाही. सर्व दृष्टीनं तपास सुरु आहे. पीएम रिपोर्टनंतर अनेक बाबी स्पष्ट होतील.

सध्या ॲक्सिडेंटल मृत्यूची नोंद करण्यात आलीय. तपास सुरु आहे. अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्तांनी दिलीय. बेवारस गाडी उभी होती, त्यासंदर्भात गाडी मालकावर केस दाखल होणार आहे. पण या घटनेत त्याचा काही हात असावा असं वाटत नाही, असंही पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

 

दोन भावंडं आणि एक त्यांची मैत्रीण

नागपूर पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टेका नाका परीसरातून शनिवारी सहा वर्षे वयोगटातील दोन मुले आणि एक मुलगी खेळताना अचानक बेपत्ता झाली. त्या तीनही चिमुकल्यांचे मृतदेह काल आढळले. मुलांचा वाहनात गुदमरल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. मुलांमध्ये दोन भावंडे तर एक त्यांची मैत्रीण आहे.

शनिवारी सायंकाळी सहा वर्षे वयोगटातील तीनही मुले टेका नाकाजवळील फारुख मैदानावर खेळत होते. रात्र झाली तरीही मुले घरी न परतल्याने पालकांनी शोधाशोध केली. पालकांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी लगेच त्या भागातील उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. मुले बेपत्ता होऊन २४ तासांचा अवधी उलटून गेल्यानंतरही पोलिसांना मुलांना शोधता आले नव्हते.

वाहनात बेशुद्ध अवस्थेत सापडले

पोलिसांनी अपहृत तीनही मुलांचे छायाचित्र आणि माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित केली. नागरिकांना आवाहन केले होते. मुलांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी पुन्हा फारुखनगरात शोधणे सुरु केले. तीनही मुलांचे वय लक्षात घेता ते जास्त दूर गेले नसल्याचे पोलिसांना खात्री होती. त्यात रात्री आठ वाजता एका वाहनात तीनही मुले बेशुद्धावस्थेत मिळून आले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.