
नात्यांना काळीमा फासणारी एक थरारक घटना नागपूरमधील पारडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. बालपणापासून मनात साचलेल्या द्वेषातून पुतण्याने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने काकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुणाल कुंभारे असे आरोपीचे नाव आहे. तर डोमा कुंभारे हे काकाचे नाव आहे. कौटुंबिक वैर आणि जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
डोमा कुंभारे यांनी सुमारे दहा वर्षांपूर्वी कुणाल कुंभारेच्या आईला पळवून नेले होते. ते पती-पत्नीप्रमाणे एकत्र राहत होते. यामुळे कुणाल कुंभारे यांच्या मनात लहानपणापासून राग होता. तसेच दुसरीकडे यावरुन कौटुंबिक कलह देखील सुरु होता. कुणालची आजी त्याचा सांभाळ करत होती. यामुळे कुणालने मोठा झाल्यावर काकाला संपवण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास डोमा कुंभारे हे आपल्या मोपेड दुचाकीवरून पारडी भागातील तळमळे वाडी परिसरातून घरी परतत होते. याचवेळी दबा धरून बसलेल्या आरोपी कुणालने आपल्या दोन साथीदारांसह त्यांना अडवले.
काका डोमा यांना अडवल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर लगेचच तिन्ही आरोपींनी डोमा यांच्यावर चाकूने अतिशय निर्दयीपणे सपासप वार केले. हा हल्ला इतका तीव्र होता की, डोमा यांना प्रतिकार करण्याची संधी मिळाली नाही. डोमा हे रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावरच कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या हत्येनंतर तिन्ही आरोपी लगेच घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. गंभीर जखमी झालेल्या डोमा यांना स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यावर त्यांना मृत घोषित केले. डोमा कुंभारे हे मोलमजुरी करून पोट भरत होते. याप्रकरणी पारडी पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी कुणाल कुंभारे आणि त्याचे दोन साथीदार सध्या फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके सक्रिय झाली आहेत. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान डोमा कुंभारे यांच्या निर्घृण हत्येमुळे नागपूरच्या पारडी परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. पारडी पोलिसांची पोलिसांनी आरोपींची माहिती देण्याचे आवाहनही केले आहे. या प्रकरणाचा जलदगती तपास करून पीडित कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अशा कौटुंबिक वादातून झालेल्या गुन्ह्यांमुळे समाजात वाढत चाललेला हिंसाचार हा एक गंभीर सामाजिक प्रश्न बनला आहे.