
मॅट्रिमोनिअल साईटवर फेक प्रोफाईल तयार करुन लग्नाळू महिलांना फसवणाऱ्या एका लखोबा लोखंडेला नागपुर पोलिसांनी अटक केली आहे. या तरुणाने नागपूरातील एका वकील महिलेला लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर लैगिंक अत्याचार तर केलेच शिवाय या महिलेच्या भावाकडून शेअर बाजाराच्या नावाने पैसे उकळून त्याचीही लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.
नागपुरातील वकील महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या शारीरिक शोषण करणाऱ्या एका लखोबा लोखंडे याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. त्याने या महिलेच्या भावाची आर्थिक फसवणूक केल्याचेही उघडकीस आले आहे. नागपूरमध्ये राहणाऱ्या एका 47 वर्षीय महिलेने लग्नासाठी तिचे प्रोफाईल विवाह संकेतस्थळावर नोंदवले होते आणि त्यावरून कल्पेश कक्कड याची ओळख तिच्याशी झाली. यानंतर दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला. त्यानंतर त्याने लग्नाआधीच तिच्याशी शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. महिलेच्या घरी येऊन तिला गुंगीचे औषध देऊन महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आलं….
या सोबतच महिलेच्या भावाला शेअर मार्केटमध्ये नफा मिळवून देतो असे आमिष दाखवत त्याच्याकडूनही 12 लाख रुपये उकळले. त्याचे मन भरल्यानंतर तो लग्नास टाळाटाळ करु लागला. त्यानंतर या महिलेने या तरुणाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. यानंतर पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस करीत त्याला शोधून काढले. अखेर आरोपी कल्पेश कक्कड याला मुंबईतून अटक केली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अरुण क्षिरसागर यांनी सांगितले.
आरोपी कल्पेश कक्कड याची पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी केली. त्याने अशाच पध्दतीने अनेक महिलांची फसवणूक केली असल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत असून या लखोबा लोखंडे याने किती महिलांची फसवणूक केली याचा शोध घेतला जात आहे.