महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी, तलाठी परीक्षेत गैरप्रकार, संशयित पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Aug 17, 2023 | 11:33 PM

जवळपास चार ते पाच वर्षांनी तलाठी भरती निघाली आहे. या तलाठी भरतीत अनेक तरुणांची सरकारी नोकरी मिळवण्याची प्रचंड इच्छा आणि महत्त्वकांक्षा आहे. पण त्यांच्या या महत्त्वकांक्षावर पाणी फेडण्याचं काम काही जणांकडून केलं जात असल्याचं समोर येताना दिसत आहे.

महाराष्ट्रातील खळबळजनक बातमी, तलाठी परीक्षेत गैरप्रकार, संशयित पोलिसांच्या ताब्यात
Follow us on

चैतन्य गायकवाड, Tv9 मराठी, नाशिक | 17 ऑगस्ट 2023 : नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत गैरप्रकार घडत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. संबंधित प्रकारामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यभरातील लाखो तरुण सध्या तलाठी भरतीच्या 4 हजार 600 पेक्षा जास्त जागांच्या निघालेल्या भरतीसाठी आपलं नशिब आजमवत आहेत. यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत. ते प्रचंड जिद्द आणि चिकाटीने परीक्षेचा अभ्यास करत आहेत. असं असताना नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत गैरप्रकार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

म्हसरुळ परिसरातील दिंडोरी रोडवरील केंद्राबाहेरून एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून वॉकीटॉकी, मोबाईल फोन, टॅब आणि हेडफोन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेला संशयित तरुण हा औरंगाबाद जिल्ह्याचा रहिवासी आहे. संशयिताच्या मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळले आहेत. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामागे एखादे रॅकेटच कार्यरत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रात आज वेगवेगळ्या केंद्रावर तलाठी या पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. यानुसार नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिंडोरी रोडवरील वेब इन्फोटेक सोल्युशन, प्रा. लि. या परीक्षा केंद्रावर तलाठी पदासाठी ऑनलाईन परीक्षा झाली. या परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी आलेल्या काही उमेदवारांनी परीक्षा केंद्राबाहेरच्या परिसरात एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याबाबत बंदोबस्तावरील पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले.

यानुसार त्या व्यक्तीची पोलीस कर्मचाऱ्यांनी झडती घेतली. त्याच्याकडे कॉपी करण्यासाठीचे हायटेक साहित्य, कानात लावण्याचे स्पाय हेडफोन, वॉकीटॉकी, दोन मोबाईल, एक टॅब असे मिळून आले. या व्यक्तीकडील मोबाईल फोनमध्ये ऑनलाईन परीक्षेच्या संगणकावरील प्रश्नांचे फोटो मिळुन आले. या व्यक्तीचे साथीदारांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.