
जळगावजवळच्या नशिराबाद येथे पुलाच्या ठिकाणी झोपलेल्या तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नशिराबाद गावाजवळ पुलाच्या ठिकाणी परप्रांतीय मजूर रात्री झोपलेले असतानाच एक अज्ञात वाहन काळ बनून आले आणि त्याने चिरडल्याने तिघांचा हकनाक बळी गेला. मंगळवारी पहाटे ही दुर्दैवी घटना उघडकीस येताच एकच कल्लोळ माजला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून त्यांनी तिघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यासाठी पाठवले. दरम्यान या घटनेबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जवळच्या नशिराबाद नजीक असलेल्या खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू आहे. तेथे अनेक मजूर रात्रंदिवसस घाम गाळून काम करत असतात. काल नेहमीप्रमाणे काम दिवसभर काम केल्यावर काही मजुरांनी रस्त्याच्या कडेलाच अंग टाकले. दमल-भागलेले ते जीव गाढ झोपेत होते, पण सकाळी उठलेच नाहीत. रस्त्याच्या शेजारी असलेल्या पुलावर ते झोपले होते. मजूर झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्याने अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृत झालेले हे तीनही मजूर परप्रांतीय होते, मात्रे ते कोणे, नेमके कुठून आले होते, त्यांची ओळख वगैरे यांसदर्भात पोलिसांकडून अद्याप माहिती घेण्याचं काम सुर आहे. या दुर्दैवी अपघाता संदर्भात नशिराबाद पोलीसठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस या घटनेचा कसून तपास करत आहेत.