मित्राने शोधली बायको, अन् तिने लावला 5 लाखांचा चुना, नवी मुंबईत नेमकं काय घडलं?

निखिलने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी श्वेता, तिच्या भावा आणि आईवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लग्नाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकींचा एक आणखी प्रकार आहे.

मित्राने शोधली बायको, अन् तिने लावला 5 लाखांचा चुना, नवी मुंबईत नेमकं काय घडलं?
marriage
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 14, 2025 | 4:27 PM

गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. हल्ली लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातच आता नवी मुंबईतील उलवेमध्ये एका तरुणाला याच पद्धतीने गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. निखिल सिंग असे फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. त्याला लग्नाचे स्वप्न दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तब्बल ५.५ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या महिलेसह तिचा भाऊ आणि आईविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उलवेमधील रहिवासी निखिल सिंग यांच्या आईने २०२३ मध्ये एका मित्राला त्यांच्यासाठी मुलगी शोधण्यास सांगितले होते. या मित्राच्या माध्यमातून निखिलची ओळख श्वेता रंजन नावाच्या महिलेशी झाली. सुरुवातीला महिलेने स्वतःबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. पण त्यानंतर हळूहळू त्यांची मैत्री झाली. त्यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

मात्र यानंतर श्वेताने विविध कारणं देत साखरपुडा पुढे ढकलण्यास सुरुवात केली. तिने निखिलकडून अनेकदा एकूण ५ लाख ५८ हजार रुपये उकळले. जेव्हा निखिलने याबद्दल तिच्या भावाला सांगितले, तेव्हा त्यानेही निखिलला धमक्या देण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर निखिलने आपल्या ज्या मित्राच्या माध्यमातून श्वेताशी ओळख झाली, त्याला याबाबत विचारले. तेव्हा त्याला समजले की श्वेताचे पहिले लग्न २०१८ मध्ये झाले होते. त्यानंतर तिचा घटस्फोट झाला होता.

पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल

या धक्कादायक माहितीनंतर निखिल सिंग यांनी तात्काळ एनआरआय पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी निखिलच्या तक्रारीची दखल घेत श्वेता रंजन, तिचा भाऊ आणि आई यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश करणे पोलिसांसमोर आता मोठे आव्हान आहे.