वाहतूक पोलिसाची कमाल, लाच घेताना घाबरलाही नाही…फोन पेवरून घेतली लाचेची रक्कम, व्हिडिओ व्हायरल…

Crime News: ऑनलाईन लाच प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई होणार? किंवा त्याची काहीच दखल घेतली जाणार नाही? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

वाहतूक पोलिसाची कमाल, लाच घेताना घाबरलाही नाही...फोन पेवरून घेतली लाचेची रक्कम, व्हिडिओ व्हायरल...
फोन पे वरून पाचशे रुपयांची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल
| Updated on: Jul 18, 2024 | 12:22 PM

सर्वसामान्य व्यक्तीने वाहतूक नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. परंतु अनेक बडे म्हटले जाणारे व्यक्ती ओळखीमुळे सुटतात. अनेकदा वाहतूक पोलीस तडजोड करत असतात. दंड न आकारता रोख रक्कम घेऊन वाहनधारकांना सोडून देतात. या पद्धतीने लाच घेणारे महाभाग असतात. परंतु छत्रपती संभाजीनगरातील एका पोलिसाने कमालच केली. ऑनलाईनच्या जमान्यात लाच ऑनलाईन घेतली. ऑनलाईन लाच घेताना त्या हवालदाराच्या व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

लाच घेतल्यावर पोलीस म्हणाला…

छत्रपती संभाजीनगरात वाहतूक पोलिसाने सिट बेल्ट न लावल्यामुळे एका कारचालकाला पकडले. त्यांना अडीच हजार रुपये दंड भरावे लागणार असल्याचे सांगितले. कारचालक शंभर रुपये देत होतो. तेव्हा शंभर रुपये नका देऊ, असे सांगताना वाहूतक पोलीस व्हिडिओत दिसत आहे. तुम्हाला अडीच हजार रुपये दंड सांगितला होता. तुमचे अडीच हजार वाचवत आहे, पाचशे रुपये भरा. तो वाहनचालक पाचशे रुपये नसल्याचे म्हणतो. शेवटी पाचशे रुपये फोन पे वरून त्या पोलिसाच्या खात्यात जमा केले. ते पैसे मिळाल्यावर वाहतूक पोलीस त्यांना यापुढे सिट बेल्ट लावत जा. नवीन गाडी घेतली असल्याचे सांगताना दिसत आहे. १ मिनिट ४६ सेंकदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

युजर्सकडून अनेक कॉमेंट

फोन पे वरून पाचशे रुपयांची लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सकडून अनेक कॉमेंट व्यक्त होणे सुरु झाल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध माध्यमातून व्हायरल झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सेवन हिल परिसरातील ही घटना आहे. अंबिका पान सेंटर या फोन पे अकाउंटवर वाहतूक पोलिसाने ही पाचशे रुपयांची लाच घेतली आहे.

दरम्यान, या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यावर काय कारवाई होणार? किंवा त्याची काहीच दखल घेतली जाणार नाही? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.