प्रसूतीनंतर मृत्यू पावलेल्या महिलेची स्मशानभूमीतून राख चोरणारी टोळी गजाआड

| Updated on: Feb 23, 2021 | 9:59 PM

परंडा तालुक्यातील देवगाव खुर्द इथं प्रसूतीनंतर मृत्यू पावलेल्या महिलेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर राहिलेली राख चोरणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे.

प्रसूतीनंतर मृत्यू पावलेल्या महिलेची स्मशानभूमीतून राख चोरणारी टोळी गजाआड
Follow us on

उस्मानाबाद : पैसा मिळवण्यासाठी नरबळी, करणी करण्यासाठी लिंबू, बाहुलीचा वापर असे अंधश्रद्धेचे अनेक प्रकार तुम्ही ऐकले किंवा पाहिलेही असतील. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात एक वेगळा पण धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे. परंडा तालुक्यातील देवगाव खुर्द इथं प्रसूतीनंतर मृत्यू पावलेल्या महिलेवर अंत्यसंस्कार केल्यानंतर राहिलेली राख चोरणारी टोळी गजाआड करण्यात आली आहे.(Osmanabad police arrested a gang carrying the ashes of a dead woman)

देवगाव खुर्दच्या ग्रामस्थांनीच या टोळीचा पर्दाफाश केलाय. या टोळीतील दोघांना पकडून ग्रामस्थांनी पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील 2 जणांचा अटक केली असून, 2 जण फरार आहेत.

गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर आईचा मृत्यू

देवगाव खुर्द इथं एका महिलेनं गोंडस बाळाला जन्म दिला. पण दुर्दैवाने प्रसूतीनंतर या महिलेचा मृत्यू झाला. या महिलेच्या पार्थिवावर 22 फेब्रुवारी रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, आज स्मशानभूमीत काही लोक अंत्यसंस्कार करत असलेल्या महिलेची राख भरत असल्याचा प्रकार काही ग्रामस्थांच्या लक्षात आला. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. माहिती मिळताच ग्रामस्थांनी स्मशानभूमीच्या दिशेनं धाव घेतली.

गावकऱ्यांनी आरोपींना पकडलं

गावकरी येत असल्याची माहिती मिळताच राख भरणारे दोघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण दोन जणांचा ग्रामस्थांनी राखेच्या पिशवीसह रंगेहात पकडलं. यावेळी ग्रामस्थांनी आरोपींना चांगलाच चोप दिला. काही गावकऱ्यांनी हा संपूर्ण प्रकार पोलिसांना कळवला. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलीसही घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं

आरोपी माढा तालुक्यातील बारलोणीचे

पोलिसांनी अटक केलेले आरोपी माढा तालुक्यातील बारलोणी गावातील असल्याचं उघड झालं आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक महिला तर एक पुरुष आहे. पळून गेलेल्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार जादूटोणा करण्यासाठी केला जात असल्याची चर्चा देवगाव खुर्दमध्ये सुरु आहे. मात्र, आरोपी मृत महिलेची राख का घेऊन जात होते, हे पोलिसांकडून अद्याप तरी सांगण्यात आलेलं नाही.

या प्रकरणात परंडा पोलीस ठाण्यात कलम 297, 379, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांनी दिली आहे. परंडा पोलीस या संपूर्ण प्रकाराचा तपास करत आहेत.

इतर बातम्या :

काँग्रेसच्या महिला पदाधिकारीने लुबाडलं, शिवसेनेच्या महिला आघाडीनं चोपलं, कल्याणमध्ये तुफान राडा

जन्मदात्यांनी दर्ग्याजवळ सोडलं, पोलिसांनी ममत्व जपलं, पुण्यात चिमुरडीच्या पालकांचा शोध सुरु

Osmanabad police arrested a gang carrying the ashes of a dead woman