करणी काढून देते सांगत मालकाला लाखो रुपयांचा गंडा, ठग मोलकरणीला पोलिसांनी घातल्या बेड्या

डोंबिवली पलावा या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये वसंत समर्थ हे एकटेच राहतात. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे तर एकुलता एक मुलगा परदेशात असतो.

करणी काढून देते सांगत मालकाला लाखो रुपयांचा गंडा, ठग मोलकरणीला पोलिसांनी घातल्या बेड्या
करणी काढून देते सांगत मालकाला लाखो रुपयांचा गंडा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Sep 16, 2022 | 12:34 AM

डोंबिवली : तुमच्यावर करणी झाली आहे. या करणीमुळे तुमच्या पत्नीचा देखील मृत्यू झाला आहे. पूजा अर्चा करुन तुम्हाला ही करणी बाधा दूर करण्यासाठी मदत करेल, असे सांगून घरकाम करणाऱ्या मोलकरणी (Maid)ने वयोवृद्ध मालकाला लाखो रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी मोलकरणीला बेड्या ठोकल्या (Arrest) आहेत. त्रिशा केळुस्कर असे अटक आरोपी मोलकरणीचे नाव आहे. पोलिसांनी तिच्याकडून 16 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत (Seized) केला आहे. तिच्या साथीदार महिलेचा शोध पोलीस घेत आहेत.

फिर्यादी एकटेच राहतात घरी

डोंबिवली पलावा या हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये वसंत समर्थ हे एकटेच राहतात. त्यांच्या पत्नीचे निधन झाले आहे तर एकुलता एक मुलगा परदेशात असतो. त्रिशा केळुस्कर ही महिला समर्थ यांच्या घरात घरकामासाठी येत होती.

करणीमुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचे मालकाला सांगितले

अनेक महिन्यांपासून त्रिशा घरात काम करत असल्याने घराबाबत त्रिशाला पूर्ण माहिती होती. या ओळखीचा फायदा घेत त्रिशाने घरमालक वसंत यांना करणीमुळे तुमच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे, तुमचाही होईल करणी काढून देते, असे सांगितले.

पूजा-अर्चा करण्यासाठी एका महिलेशी ओळख करुन दिली

मी एका महिलेला ओळखते, तिच्याकडे वेगळी शक्ती आहे. ती तुमची पिडा दूर करेल असे सांगून पूजा अर्चा करुन तुम्हाला ही करणी बाधा दूर करण्यासाठी मदत करेल. त्यासाठी पैसे लागतील असे सांगत तिने मरियम नावाच्या महिलेशी वसंत समर्थ यांची भेट घालून दिली.

दोघींनी फिर्यादींकडून लाखोंचा ऐवज लुटला

या दोघींनी मिळून समर्थ यांच्या घरात पूजेचा दानधर्म जेवणाचा घाट घातला. या माध्यमातून त्यांनी वसंत समर्थ यांच्याकडून 15 लाख 87 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच वस्तू स्वरूपात घड्याळ, म्युझिक सिस्टम, कपडे, सेलेरो कंपनीची कार अशा वस्तू घेतल्या.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच समर्थ यांनी पोलीस ठाणे गाठले

काही दिवसांनी आपली फसवणूक झाल्याचे वसंत यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. मानपाडा पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत गुन्हा दाखल करत त्रिशाचा शोध घेऊन तिला बेड्या ठोकल्या.

सध्या त्रिशाची साथीदार मरियम फरार असून मानपाडा पोलीस तिचा शोध घेत आहेत. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांचे पथक मरियमचा शोध घेत आहेत.

या घटनेनंतर अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी अशा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नये, संशय आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.