Palghar Crime : आई अशी असू शकते ? तिच्या एका कृत्याने हादरलं संपूर्ण गाव ! जन्मानंतर अवघ्या पाच दिवसांनीच…
पालघरमध्ये एका आईने मातृत्वाला काळिमा फासणारे कृत्य केले आहे. आशा सेविकेच्या सतर्कतेमुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

पालघर | 16 सप्टेंबर 2023 : ‘आई म्हणोनी कोणी, आईस हाक मारी ती हाक येई कानी…’ आपल्यापैकी अनेक जणांनी हे गाणं ऐकलं असेल. आईची महती सांगणारी अनेक गाणी आहेत. जगातील सर्व सुखं पायाशी आली तरी आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपल्याने जो आनंद मिळतो, ती सर कशालाच नाही. आई असतेच अशी, प्रेमळ पण वेळी तितकीच कठोरही होणारी. अशा आई- मुलांच्या अनेक गोष्टी आपल्याला माहित आहेत. पण एखादी आई आपल्याच मुलाच्या किंवा मुलीच्या जीवावर उठली तर ? विश्वास बसत नाही ना, पण आजच्या युगात असंही घडू शकतं. अशीच एक मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना (crime news) पालघरमध्ये उघडकीस आली (palghar crime) आहे. जेथे एका आईने, तिच्या अवघ्या पाच दिवसांच्या लेकीचा जीव घेतल्याचे समोर आले आहे.
पालघरच्या तारापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघड झाले आहे. पण तिने ही हत्या का केली, ते उघड झाल्यावर तर सर्वांचाच संताप झाला. तिसरी मुलगी झाल्याने या निर्दयी मातेने हे पाऊल उचचल्याची माहिती समोर आली आहे. अखेर तिला पोलिसांनी अटक केली आहे.
का केली हत्या ?
श्रेया असे (32) त्या निर्दयी मातेचे नाव असून ती तारापूर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या घेवली या गावात राहते. या विवाहीत महिलेला एक मोठी मुलगी व दुसरा मुलगा आहे. ती तिसऱ्यांदा गरोदर होती, प्रसूतीनंतर आपल्याला पुन्हा मुलगा होईल, अशी तिला अपेक्षा होती. मात्र तिला झाली मुलगी, आणि तिचा भ्रमनिरास झाला. मुलगी झाल्याने नाराज असललेल्या श्रेयाने तिच्या पोटच्या लेकीचा जीव घेतला. ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, मुलीची हत्या केल्याचा पुरावा सापडू नये म्हणून त्या निर्दयी मातेने तिच्या चिमुकल्या मुलीचा मृतदेह नदीत फेकून दिला.
आशा कर्मचाऱ्यामुळे उघड झाला गुन्हा
अवघ्या काही दिवसांपूर्वीच जन्म झालेल्या बाळाची तपासणी करण्यासाठी आशा सेविका घरी गेली असता आरोपी महिलेने तिला उडवाउडवीची उत्तरं दिली . यामुळे तिला संशय आला. अखेर त्या कर्मचारी महिलेने शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. तेव्हा आरोपी महिला एक दिवस तिच्या मुलीसोबत घराबाहेर गेली होती पण घरी परत येताना ती एकटीच होती, अशी माहिती शेजारच्या एका व्यक्तीने दिली. हे ऐकल्यावर त्या आशा सेविकेचा संशय बळावला. तिने वरिष्ठांना याची कल्पना दिल्यानंतरच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून आरोपी महिलेला तारापूर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तारापूर पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे .
