
मुंबईच्या वरळी भागात घडलेल्या एका घटनेने सध्या सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाला अवघे काही महिनेच झाले असतानाच हा प्रकार घडल्याने अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आलं आहे. गौरी गर्ज असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव असून तिच्या कुटुंबाने अनंतवर गंभीर आरोपही केले आहेत.
अनंत हा बऱ्याच वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत आहे
या घटनेबद्दल अनेक उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून घटनास्थळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली आहे. ज्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण देखील निर्माण झाले आहे. भाजप नेत्या तथा राज्याच्या पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक अनंत हा बऱ्याच वर्षांपासून पंकजा मुंडे यांच्यासोबत काम करत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
पंकजा यांनी अनंत आणि गौरीच्या लग्नासाठी एक खास पोस्टही शेअर केली होती
आत्महत्या केलेली गौरी गर्जे ही डॉक्टर असून त्यांच्या लग्नाला अवघे दहाच महिने झाले होते. अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांचा विवाह देखील मोठ्या ताथामाटात झाला होता. त्यांच्या लग्नात पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. त्यांनी लग्नात या दोघांना एक छान गिफ्ट देखील दिलं होतं. तसेच त्यांच्या लग्नासाठी एक खास पोस्टही शेअर केली होती. त्यांची ही पोस्ट आता पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
“माझ्या पुत्रासमान, माझा स्वीय सहाय्यक…”
पंकजा मुंडेंनी पोस्टमध्ये म्हटले होते की, “माझ्या पुत्रासमान, माझा स्वीय सहाय्यक चि. अनंत गर्जे याचा आज शुभ विवाह पार पडला. चि. सौ.कां. डाॅ.गौरी सारखी सुंदर आणि सुशील सहचारिणी त्याला मिळाली. आज बीड येथे या दोघांच्या शुभ विवाह सोहळ्यात माझी आई, डॉ.प्रितमताई यांचेसह उपस्थित राहून नव वधू-वरांना शुभाशीर्वाद दिले. समवेत आ.नमिता मुंदडा उपस्थित होत्या.” अशी पोस्ट त्यांन केली होती तसेच त्यांनी लग्नाचे काही फोटोही शेअर केले होते. पण आता 10 महिन्यातच गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याचा आरोप
दरम्यान अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर असल्याने गौरी गर्जे अस्वस्थ असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गौरी गर्जे यांचा सासरच्या मंडळींकडून छळ होत होता, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. ही आत्महत्या नसून हत्या आहे असा थेट आरोप गौरी गर्जे यांच्या कुटुंबियांनी केला असून याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी कुटुंबीय दाखल झाले आहेत. जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिकाही कुटुंबियांनी घेतली होती.
मुलीच्या मृत्यूसंदर्भात कुटुंबीयांचा आरोप
मुलीच्या कुटुंबीयांनी तिच्या मृत्यूसंदर्भात गंभीर संशय व्यक्त केला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार, अनंत हा एका नामांकित राजकीय नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यालयात पीए म्हणून कार्यरत आहे. पतीचे बाहेर प्रेमसंबंध असल्याचा संशय गौरीने वारंवार कुटुंबीयांना व्यक्त केला होता. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, तरुणीने पतीच्या कथित संबंधांचे काही पुरावे स्वतःच्या वडिलांना देखील पाठवले होते. या डिजिटल पुराव्यांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.