
सबसे बडा रुपय्या… अशी म्हण तुम्हाला माहितीच असेल. पैशांचा हाव माणसाला संकटात टाकते. अशाच नजारा बिहारच्या पाटणा येथील एका अभियंत्याबाबत घडला आहे. आर्थिक गुन्हे विभागाच्या रडारवर असलेल्या ग्रामीण कार्य विभागाचे अभियंता विनोद कुमार राया यांच्या घरावर छापा टाकण्यात आला तेव्हा जे दृश्य दिसले ते पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
आर्थिक गुन्हे विभागाने (EOU) दिलेल्या माहितीनुसार विनोद कुमार राय याने जेव्हा स्वत:ला कळले की त्याच्या मागे अधिकारी लागले तेव्हा त्याने त्याच्याकडील पैसा जाळला. त्याने पाण्याच्या टाकीतही पैसे ठेवले होते. वास्तविक एवढा उपद् व्याप करुनही अधिकाऱ्यांच्या नजरेपासून तो वाचला नाही.
EOU च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 21 ऑगस्टला आर्थिक गुन्हे विभागाला विनोद कुमार राय आपल्या कार्यालयातून पांढऱ्या इनोव्हा कारमधून निघाले असल्याचे गुप्त माहितीद्वारे कळले, त्यांच्या कारमध्ये अवैध मार्गाने जमा केलेली रोकड असल्याचे त्यांना कळाले. याची माहिती मिळताच एएसपी कुमार इंद्रप्रकाश आणि डीएसपी यांच्यासह वरीष्ठ पोलिस निरीक्षकांसह एसआयटीची स्थापना केली. पाटणाच्या अगम कुआ थाना येथील भूतनाथ रोड स्थित निवासस्थानी छापा टाकून कारवाई सुरु केली.
आर्थिक गुन्हे विभागाने कारवाई करण्याची कूणकूण लागताच विनोद कुमार राय यांनी स्वत:च्या घरातच नोटांच्या गड्ड्यांना जाळण्यास सुरुवात केली. झडती करताना आर्थिक गुन्हे विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठ्या संख्येने अर्धवट जळलेल्या नोटांचे तुकडे घराच्या टॉयलेटमधील पाईपमध्ये सापडले. त्यांनी अशा प्रकारे नोटा जाळल्या की घराची सांडपाण्याची लाईन चोकअप झाली होती. शेवटी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने या बंद नाले उघडले. जेव्हा हे पाईप उघडले तर सर्वांना धक्का बसला. त्यांच्या पाईपमधून अर्धवट जळालेल्या नोटांचे तुकडे सापडले. घराच्या तपासणी पाण्याच्या टाकीत लपवलेल्या 500 रुपयांच्या नोटा सापडल्या. जे मोजले असता ते 39 लाख 50 हजार रुपये निघाले.याशिवाय जळालेल्या पाचशे रुपये जमेस धरताच सुमारे 52 लाख रुपयांची रक्कम झाली आहे.
आर्थिक गुन्हे विभागाने दिलेल्या माहितीनुसार झडतीत आता पर्यंत 26 लाख रुपये किंमती सोने आणि चांदीचे दागिने, विमा पॉलीसी आणि कागदपत्रे तसेच चल आणि अचल संपत्तीचे दस्ताएवज आणि इनोव्हा क्रिस्टा कार देखील जप्त करण्यात आली आहे. विमा पॉलीसीचे कागदपत्रांचे मुल्यांकन केले जात आहे. याप्रकरणात सध्या चौकशी सुरु असून त्यात आणखी कोणी सापडले तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.
आर्थिक गुन्हे विभागाने स्पष्ट केले आहे घराची तपासणी केल्यानंतर विनोद कुमार राय या संपूर्ण गैरव्यवहारात प्रथमदर्शनी सहभागी असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांची पत्नी बबली राय यांनी अधिकाऱ्यांच्या टीमला अडवले आणि घरात प्रवेश करु दिला नाही. शिवीगाळ करुन तपासकामात अडथळे आणले. त्यामुळे त्यांची पत्नी बबली राय यांच्यावरही केस दाखल करुन कारवाई केली जात आहे.