
गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यातील गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये किरकोळ वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाला आहे. यात तरुणाच्या हाताच्या पंजाचे दोन तुकडे झाले आहेत. मात्र यानंतर लगेच आरोपींना जामीनही मिळाला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी पिंपरी चिंचवडमधील वाकड पोलिस स्टेशन समोर आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या घटेनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या राहुल कणघरे याचे घराशेजारी राहणाऱ्या रोहनसोबत पूर्वीचे वाद होते. त्यामुळं दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. रोहन अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टीतून भांडण करायचा. चार दिवसांपूर्वीही दोघांमध्ये असाच वाद झाला होता. या रागातून रोहनने त्याचे मित्र शुभम आणि प्रशांतच्या मदतीने राहुलला संपवण्याचा कट रचला.
घरात बसलेल्या राहुलला विश्वासात घेऊन आरोपींनी बाहेर बोलावलं. ते थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानशेजारी आले, तिथं दोन्ही मित्रांनी राहुलला पकडले अन रोहनने शस्त्राने डोक्याच्या दिशेने वार केला. राहुलने डोक्यावरचा वार चुकवण्यासाठी हात मध्ये घातला. यात डावा पंजा शरीरापासून वेगळा झाला तर उजवा पंजा अर्धा कापला गेला.
याप्रकरणी वाकड पोलिसांनी रोहन निमज, शुभम पवार आणि प्रशांत सकट या तिघांना बेड्या ठोकल्या. मात्र हे प्रकरण इतकं गंभीर असताना घटनेच्या दुसऱ्या दिवशी तिन्ही आरोपींना जामीन मिळाला. यामुळे राहुलचे नातेवाईक संतप्त झाले असून त्यांनी वाकड पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केले.
यानंतर वाकड पोलिसांनी नव्या कायद्यामुळं जामीन मिळाल्याचा दावा केला. आता या तिघांना पुन्हा एकदा अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचं वाकड पोलिस म्हणाले. त्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली आहे. मात्र आता अटक करण्याची परवानगी मिळेपर्यंत हे तिन्ही आरोपी पसार होणार तर नाहीत, याची खबरदारी पोलीस घेणार का ? याकडे ही सर्वांचं लक्ष लागले आहे.