राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर गोळी झाडणारे 7 तासात सापडले, बारामतीत अल्पवयीन तरुणासह चौघांना अटक

| Updated on: Jun 01, 2021 | 2:44 PM

बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तावरेंवर दुचाकीस्वारांनी भररस्त्यात गोळीबार केला होता. ( Baramati NCP Raviraj Taware attackers arrested)

राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर गोळी झाडणारे 7 तासात सापडले, बारामतीत अल्पवयीन तरुणासह चौघांना अटक
Raviraj Taware
Follow us on

बारामती : राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर गोळीबार प्रकरणी आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बारामतीत अल्पवयीन तरुणासह चौघांना अटक करण्यात आली आहे. बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या सात तासात आरोपींचा छडा लावला. राजकीय वैमनस्यातून रविराज तावरेंवर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास तावरेंवर दुचाकीस्वारांनी भररस्त्यात गोळीबार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविराज तावरे हे जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आहेत. बारामती शहरातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Pune Crime News Baramati NCP Leader Raviraj Taware attackers arrested)

एका अल्पवयीन तरुणासह राहुल उर्फ रिबेल यादव, प्रशांत मोरे, विनोद उर्फ टॉम मोरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली. बारामती तालुका पोलिसांसह गुन्हे शोध पथकाकडून आरोपींना अटक करण्यात आली. बारामतीच्या इतिहासात प्रथमच एका राजकीय नेत्यावर हल्ल्याची घटना घडली

नेमकं काय घडलं?

रविराज तावरे हे पत्नी- जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्यासह सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास संभाजीनगरला वडापाव घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या दोघा जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नी रोहिणी तावरे यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे या परिसरात क्रिकेट खेळणारी मुले धावत आली. तोपर्यंत हल्लेखोरांनी गोळीबार करुन पळ काढला होता. जखमी अवस्थेतील तावरेंना तातडीने मित्राच्या कारमधून बारामती येथील खासगी रुग्णालयात हलवले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय

रविराज तावरे हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेले रविराज तावरे यांच्या पत्नी रोहिणी तावरे या पणदरे-माळेगाव गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. माळेगावची ग्रामपंचायत रद्द होऊन नुकतीच नगरपंचायत झाली. येत्या काही काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे. गाव पातळीवरील राजकारणातून हा प्रकार झाला असावा असा संशय आधीपासूनच व्यक्त होत होता.

रविराज तावरेंवर खासगी रुग्णालयात उपचार

या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिस आणि वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधत सूचना केल्या. या घटनेनंतर माळेगावमधील वातावरण तणावपूर्ण बनले असून मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविराज तावरे यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

अजित पवार यांच्या जवळच्या कार्यकर्त्यावर गोळीबार, पोटात गोळी लागल्याची प्राथमिक माहिती

बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच राजकीय नेत्यावर गोळीबार, राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर कसा झाला हल्ला?

(Pune Crime News Baramati NCP Leader Raviraj Taware attackers arrested)