
Ayush Komkar Murder Case : पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आयुष्य कोमकर या तरुणासा पार्किंगमध्ये धडाधाड गोळ्या घालण्यात आल्या. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणात एकूण 13 आरोपी असून 5 आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, न्यायालयातील सुनावणीदरम्यान या हत्या प्रकरणात नवा धागा समोर आला आहे. आयुष कोमकरची आई आणि आरोपी बंडू आंदेकर यांच्यातील वाद आता युक्तिवादादरम्यान समोर आला आहे.
आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 6 आरोपींना पुणे पोलिसांनी आज न्यायालयात हजर केलं. काल (8 सप्टेंबर) रात्री या आरोपींना अटक करण्यात आली होती. अमन पठाण ,सुजल मेरगू, बंडू आंदेकर, स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वच आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी न्यायालयात महत्त्वाच्या विषयांवर युक्तिवाद झाला. पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात आरोपींचा कसा सहभाग नाही, हे कोर्टाला पटवून सांगण्याचा प्रयत्न करत पोलीस कोठडीला विरोध केला. याच युक्तिवादादरम्यान बंडू आंदेकर आणि आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांच्यातील वादाचा मुद्दा उपस्थित झाला.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर याला अटक करण्यात आली आहे. कोर्टात बंडू आंदेकर यांचे वकील प्रशांत पवार यांनी हा गुन्हा जेव्हा गडला तेव्हा माझे अशील महाराष्ट्रात नव्हते. ते देवदर्शनाला चालले होते. या गुन्ह्यात बंडू अंदेकर यांना गोवण्यात आले आहे. सूडभावनेतून बंडू आंदेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा दावा केला.
तर सरकारी वकिलांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपींचा कसा सहभाग आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करत पोलीस कोठडीची मागणी केली. 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज आंदेकरचा खून झाला. त्याचाच बदला घेण्यासाठी आयुष कोमकरचा खून करण्यात आला. हे टोळीयुद्ध आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.
तसेच, बंडू आंदेकरआणि फिर्यादी कल्याणी कमोकर यांचे वाद असल्याचेही यावेळी आरोपीच्या वकिलांनी सांगितले. फिर्यादी खून झालेल्या मुलाची आई आहे. फिर्यादी आणि बंडू आंदेकर यांचे प्रॉपर्टीचे वाद आहेत. बंडू आंदेकरआणि त्यांचं सगळं कुटुंब केरळमध्ये होतं. पिस्टलचा तपास किंवा इतर गोष्टीचा बंडू आंदेकर याचा संबंध नाही, असाही दावा यावेळी आरोपीच्या वकिलाने केला. त्यामुळे आता आयुष कोमकर हत्या प्रकरणात नेमका कोणाचा हात आहे? तपासात नेमकं काय समोर येणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.