
Pune Crime: पुण्यातील गुन्हेगारीत वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आयुष हा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 13 पैकी 8 आरोपींना आज पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांसह पोलिसांनीही युक्तिवाद केला. आज कोर्टात नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
आरोपी बंडू आंदेकर यांच्या वकिलांनी सुरुवातीला रिमांड रिपोर्ट पाहण्यासाठी न्यायाधीशांकडे वेळ मागितला. आरोपी बंडू आंदेकर यांनी कोर्टात सांगितले की, ‘आम्हाला या प्रकरणात गोवलं जात आहे, हत्येच्या वेळी आम्ही केरळमध्ये होतो. मी माझ्या नातवाचा खून का करू? तो माझा वैरी नाही. वनराज अंदेकर नगरसेवक होता. तो युथ आईकोन होता. त्यामुळे त्याचा खून केला असावा.’
यानंतर पोलिसांनी युक्तिवाद करताना पोलिसांनी म्हटले की, आंदेकर कुटुंबातील सदस्यांनी कट रचून हत्या केली आहे. अमन पठाण आणि यश पाटील यांनी येथे फक्त बंडू आणि विष्णू आंदेकरच अशा घोषणा दिल्या. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी या 8 आरोपींकडून माहिती घ्यायची आहे. बंदुक कुठून आणली याचा तपास करायचा आहे. वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हा गुन्हा केला. या प्रकरणातील सर्व आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. ज्यांनी हत्या केली त्याची कपडे जप्त करायचे आहे. हे टोळी युद्ध आहे त्यामुळे 7 दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी यावेळी पोलिसांनी केली.
सरकारी वकीलांनी युक्तिवाद करताना म्हटले की, 1 सप्टेंबर 2024 रोजी वनराज अंदेकरचा खून झाला. त्याचा बदला घेण्यासाठी या मुलाचा खून करण्यात आला. हे सगळं टोळी युद्ध आहे. याबाबत सखोल तपास करायचा आहे, त्यामुळे 7 दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे. यानंतर कोर्टानेबंडू आदेकरसह इतर सर्व आरोपीना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता 15 तारखेला सर्व आरोपीना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.