MHADA Paper Leak | ‘घरातली वस्तू कधी मिळणार’, म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी आरोपींचा कोडवर्ड

| Updated on: Dec 14, 2021 | 8:28 AM

घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर, अशा आशयाचा कोडवर्ड तयार करण्यात आला होता. ज्या दिवशी पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणी कारवाई केली, त्या दिवशी आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या, त्यांना फोन करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी होणार आहे.

MHADA Paper Leak | घरातली वस्तू कधी मिळणार, म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी आरोपींचा कोडवर्ड
Jitendra Awhad
Follow us on

पुणे : म्हाडा भरती परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी (MHADA Exam) पुण्यात दोन दिवसांपूर्वी मोठी कारवाई करण्यात आली. म्हाडाचा पेपर फोडण्यासाठी (Paper Leak) आरोपींनी कोडवर्डचा (Code Word) वापर केल्याचं समोर आलं आहे. ‘घरातली वस्तू कधी मिळणार’ या कोडवर्डचा आरोपींनी वापर केल्याचा आरोप आहे.

घर म्हणजे म्हाडा आणि वस्तू म्हणजे पेपर, अशा आशयाचा कोडवर्ड तयार करण्यात आला होता. ज्या दिवशी पोलिसांनी पेपरफुटी प्रकरणी कारवाई केली, त्या दिवशी आरोपींच्या संपर्कात असणाऱ्या, त्यांना फोन करणाऱ्या प्रत्येकाची चौकशी होणार आहे. आरोपींच्या मोबाईलवर पेपरच्या आदल्या रात्री उशिरापर्यंत अनेकांचे फोन आल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे हे फोन नेमके कोणाचे आहेत, त्यातील कुणी आरोपी आहेत का, याचा तपास करण्यासाठी त्यांची चौकशी होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण

आरोग्य भरती परीक्षेचा खेळ खंडोबा सुरु असतानाच म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यावर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय. तर विरोधीपक्ष असलेल्या भाजपने या सगळ्या प्रकरणात राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून या सगळ्यांमध्ये क्लास चालकांचं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

परीक्षा आदल्या रात्री रद्द

रविवारी राज्यभरात म्हाडा भरतीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र पेपर फुटण्या संदर्भातील तक्रारी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यापर्यंत पोहचल्या. त्यानंतर आव्हाडांनी शनिवारी रात्री उशिरा ट्वीट करून ही भरती परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली. 565 जागांसाठी ही परीक्षा होणार होती.

परीक्षांची नवी तारीख म्हाडा ठरवणार

परीक्षांची नवी तारीख म्हाडा ठरवणार आहे. याच कंपनीने 2 लाख पोलिसांच्या परीक्षा घेतल्या होत्या आणि त्या व्यवस्थित पार पडल्या होत्या. पण यावेळी पोरांच्या आयुष्याचा होणारा खेळ थांबला आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच म्हाडा अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रारही केली आहे. म्हाडा पेपर फुटी आणि परीक्षा रद्द केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेत यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. या प्रकरणी पुणे पोलिसांनी सहा जणांना अटक करत टोळीचा पर्दाफाश केला आहे. तसेच यापुढे खाजगी संस्थांकडे न देता म्हाडा परीक्षा घेणार असल्याचेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. शिवाय विद्यार्थ्यांची फी ही परत करणार असे आव्हाड म्हणाले.

संबंधित बातम्या :

Mhada Exam: आरोग्य भरतीनंतर म्हाडा परीक्षेचा पेपर फुटला, नवी तारीख म्हाडा ठरवणार

MHADA exam| पुणे पोलिसांनी ‘म्हाडाचा पेपर’ फोडणाऱ्या टोळीवर अशी केली कारवाई ; जाणून घ्या नेमके काय घडले?