
पुणे शहरात लाचेचा एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. ही लाच चार कोटी पन्नास लाख रुपयांची आहे. गुन्हा दहा वर्षांनी दाखल झाला आहे. एका 73 वर्षीय व्यक्तीने पुणे न्यायालयात दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. आता 2013-2014 मधील लाचेचा या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश पुणे सत्र न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे. पुणे शहरातील हिंजवडी येथील नामांकित आयटी कंपनी कॉग्निझंट टेक्नोलॉजीसंदर्भात हे प्रकरण आहे. आता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या कंपनीची चौकशी करणार आहे.
हिंजवडी येथील कॉग्निझंट टेक्नोलॉजी इंडिया सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीला 2013-2014 च्या दरम्यान बांधकामाच्या संदर्भात पर्यावरणविषयक परवानगी हव्या होत्या. त्यांनी या परवानग्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मिळविल्या. पर्यावरण विषयक परवानगी मिळवण्यासाठी कंपनीने विविध शासकीय अधिकारी आणि इतर लोकांना कोट्यवधी रुपयांची लाच दिली. लाचेची ही रक्कम चार कोटी पन्नास लाख आहे.
पुणे शहरात बांधकाम करण्यासाठी कॉग्निझंट इंडिया या कंपनीने काही मोठ्या कंपन्यांना कंत्राट दिले होते. कॉग्निझंट इंडिया कंपनीचे तत्कालीन अधिकारी श्रीमणीकंदन राममूर्ती यांच्यावर बांधकामाची जबाबदारी दिलेली होती. त्यांनी बांधकामासाठी लागणाऱ्या परवानग्या भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून मिळविल्या. त्यासाठी त्यांनी जवळपास चार कोटी पन्नास लाख रुपयांची लाच तत्कालीन विविध शासकीय अधिकारी आणि काही खाजगी इसमांना दिली. याबाबत 73 वर्षीय व्यक्तीने पुणे न्यायालयात तक्रार केली. न्यायालयास तक्रारी तथ्य आढळल्यामुळे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156(3) प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पुणे कार्यालयास दिले आहेत.
कॉग्निझंट टेक्नोलॉजी इंडिया सोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कॉग्निझंट टेक्नोलॉजी सोलुशन्स लिमिटेड या अमेरिका स्थित कंपनीची उपकंपनी आहे. या कंपनीचे पुणे,चेन्नई, हैद्राबादसह भारतातील अनेक शहरात प्रोजेक्ट चालू आहेत.