तुमची डिग्री नकली तर नाही? पुण्यात बनावट मार्कमेमो, सर्टिफिकेट वाटणारी टोळी जेरबंद

तुमची डिग्री नकली तर नाही ना? असा प्रश्न विचारण्यामागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. कारण पुणे जिल्ह्यात बनावट मार्कशिट बनवणाऱ्या टोळीचा भंडाफोड पोलिसांनी केला आहे.

पुणे : तुमची डिग्री नकली तर नाही ना? असा प्रश्न विचारण्यामागे एक महत्त्वपूर्ण कारण आहे. कारण पुणे जिल्ह्यात बनावट मार्कशिट बनवणाऱ्या टोळीचा भंडाफोड पोलिसांनी केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांनी ही धडाकेबाज कारवाई केली आहे. संबंधित टोळी ही बनावट मार्कशिट किंवा सर्टिफिकेट तयार करुन विकायची. त्यासाठी ही टोळी हजारो रुपये घ्यायची. पण पोलिसांनी अत्यंत सावधगिरीने सापळा रचत आरोपींच्या छापखान्यावर छापा टाकत त्यांचा पर्दाफाश केला. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांचं कौतुक केलं जात आहे.

पोलिसांनी कारवाई नेमकी कशी केली?

पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पुणे जिल्ह्यामध्ये गोपनीय माहिती काढून अवैधरित्या चालणाऱ्या कृतींवर कारवाईबाबत सूचित केले होते. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदिप येळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच इतर महाविद्यालयांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पदवीच्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट हे नीरा या ठिकाणी बनावटरित्या तयार करुन ते लोकांना विकले जातात आणि त्याचा वापर केला जातो.

प्रिंटिंग प्रेसवर धाड

पोलिसांनी संबंधित माहिती खरी की खोटी याची शहानिशा करण्यासाठी सापळा रचला. त्यानुसार तसा काहीसा प्रकार केला जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पण पोलिसांना आरोपींना रंगेहाथ पकडायचं होतं. त्यामुळे पोलिसांनी पुणे विद्यापीठाच्या स्टाफला सोबत नेत नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसवर धाड टाकली. यावेळी तिथे असलेल्या सर्व कागदपत्रांची पाहणी केली असता तिथे खरंच बनावट सर्टिफिकेट आणि मार्कशिट सापडले.

तिघांना बेड्या

पोलिसांनी बनावट कागदपत्रे आणि ते बनविण्यासाठी लागणारे सर्व साहित्य जप्त केले. तसेच गणेश जावळे, मनोज धुमाळ आणि वैभव लोणकर यांना ताब्यात घेतलं. या तिघांना बारामतीतून अटक करण्यात आली. याप्रकरणी जेजुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या प्रकरणाचा पुढील तपास हा जेजुरी पोलीस करत आहेत.

पोलिसांच्या ‘या’ पथकाकडून कारवाई

दरम्यान, या प्रकरणाची आतापर्यंतची संबंधित कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे, रविराज कोकरे, अनिल काळे, सचिन घाडगे, गुरू जाधव, अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, राजू मोमीन, प्रसन्ना घाडगे यांनी केली.

विद्यार्थ्यांनो चुकीच्या मार्गाने बनावट प्रमाणपत्रे बनवू नका

खूप मेहनत करुन आपण परीक्षेत चांगले गुण मिळवतो. त्याच आधारावर आपल्याला नोकरीदेखील मिळते. पण काही तरुण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्नात चुकीचा मार्ग निवडतात. त्यामुळे ते बनावट शैक्षणिक कागदपत्रे बनावणाऱ्या टोळीच्या बळी पडतात. या टोळीला ते हजारो, लाखो रुपये देतात. पण नंतर जेव्हा नोकरीच्या वेळी किंवा इतर शैक्षणिक कामांवेळी प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाते तेव्हा त्या प्रमाणपत्रांचा नक्कीच बिंग फुटतो. त्यामुळे वाईट मार्गाचा अवलंब करण्यापेक्षा प्रामाणिक प्रयत्न करणं जास्त चांगलं.

हेही वाचा :

इन्स्टाग्रामवर मैत्री, जवळीक वाढताच अपहरण, भिवंडीच्या फ्लॅमध्ये मुलीला कोंडलं, पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं?

पडक्या घरात अघोरी प्रयोग, गुप्तधनासाठी पत्नीचा नरबळी, जालना पोलिसांनी जादूटोण्याचा खेळ उधळला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI