पुण्यात बाईक चोरणारी टोळी गजाआड! पुण्यातील खेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 8 बाईक जप्त

| Updated on: May 01, 2022 | 9:08 AM

Pune crime : याप्रकरणी दिनेश दिलीप दुधावडे वय 25 वर्षे, भाऊ पांडूरंग मेंगाळ, वय 36 वर्ष आणि विजय गुलाब सावंत वय 42 या तिघांना ताब्यात घेण्यात आलंय.

पुण्यात बाईक चोरणारी टोळी गजाआड! पुण्यातील खेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई, 8 बाईक जप्त
बाईक चोरणारे गजाआड
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पुणे : गेल्या काही दिवसांपासून बाईक चोरी करणारी टोळी (Gang of Bike Theft in Pune) पुण्यात सक्रिय होती. या टोळीच्या मुसक्या अखेर आवळण्यात आल्या आहेत. पुण्यातील खेड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध (Khed Police, Pune) पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली. पुणे ग्रामीण जिल्हयामध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश पोलिसांनी केलाय. यामधे एकूण 8 मोटारसायकलींसह 2 लाख 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. तर एकूण तीन जणांना अटक केली. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर (Junnar & Shirur) या तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. पुणे जिल्ह्यात घरफोडीचेही प्रमाण वाढलंय. दिवसासुद्धा चोरीच्या घटना घडताय. त्यामुळे पुण्यात पोलिसांचा धाक या चोरट्यावर राहिलाय की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. अनेक ठिकाणी चोरीच्या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्यात आलेत. मात्र हे चोरटे अतिशय शातिर पद्धतीने चोरी करत पोलिसांच्या हातावर तुरी देवून पलायन करत असल्यानं पोलिसासमोरची आव्हानंही वाढली आहेत.

चोरटे सापडले कसे?

खेड शहरामध्ये पाबळ चौक येथे नाकांबदी करत असताना त्याठिकाणी तीन जण एका विना नंबरप्लेटच्या स्प्लेंडर मोटारसायकलवरुन येताना दिसले. या तिघांवरही पोलिसांना संशय आला. त्यावेळी त्याना थांबवून पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्याकडील वाहनाची कोणतीही कागदपत्र नसल्याने त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांनी ही दुचाकी चोरी करून आणल्याचं तपासात उघड झालंय.

चोरट्यांकडे काय काय सापडलं?

या प्रकरणी दिनेश दिलीप दुधावडे वय 25 वर्षे, भाऊ पांडूरंग मेंगाळ, वय 36 वर्ष आणि विजय गुलाब सावंत वय 42 या तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. खेड पोलीस स्टेशनमध्ये या तिघांकडून एकूण 8 दुचाक्या असा एकूण 2,40,000/- (दोन लाख चाळीस हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आळेफाटा, नारायणगाव, मंचर येथील गुन्हे उघडकीस आले असून उर्वरीत मोटारसायकल बाबत दाखल असणारे गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून तपास केला जातोय.

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलीस निरीक्षक सतिश गुरव, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बी.एस. भोसले, पोलिस स्वप्निल गाढवे, सचिन जतकर, निखिल गिरीगोसावी, पोलिस अंमलदार शेखर भोईर, विशाल कोठावळे यांनी या कारवाई केली.