मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला मारहाण, अंगावर २९ जखमा, पोलिसांकडून धक्कादायक माहिती

vaishnavi hagawane news: पुणे येथील वैष्णवी हगवणे यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याबाबत वैष्णवीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला. सासरच्या आरोपींना अटक करण्यात आली. वैष्णवीला मृत्यूच्या दिवशीही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.

मृत्यूच्या दिवशीही वैष्णवीला मारहाण, अंगावर २९ जखमा, पोलिसांकडून धक्कादायक माहिती
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 27, 2025 | 7:36 AM

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणे यांच्या अंगावर एकूण २९ जखमा आढळल्या आहे. त्यातील १५ जखमा या मृत्यूपूर्वी चोवीस तासांच्या आत झाल्या आहेत. त्यामुळे मृत्यू झालेल्या दिवशीही वैष्णवी यांना मारहाण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शवविच्छेदन अहवालातून ही माहिती मिळाली होती. पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली. वैष्णवीचा पती, सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीतील मुक्काम वाढला आहे. या सर्वांची पोलीस कोठडी २८ मेपर्यंत वाढवण्यात आली आहे.

पुणे येथील न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांच्या कोर्टात वैष्णवी यांचे पती, नणंद आणि सासूच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यासाठी युक्तीवाद करताना मृत्यूच्या दिवशीही त्यांचा कसा छळ झाला होता, ते मांडले. न्यायालयाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकला. त्यानंतर वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांची कोठडी २८ जूनपर्यंत वाढवली.‌

वैष्णवी यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी नीलेश चव्हाण हा अद्याप फरार आहे. पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाले होते. त्यांना शनिवारी अटक करण्यात आली. या फरार असल्याच्या काळात त्यांना ज्यांनी -ज्यांनी मदत केली त्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यात कर्नाटकातील माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याचाही समावेश आहे. तसेच मावळमधील फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक, सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील राहुल जाधव, अमोल जाधव, तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे या चौघांचा समावेश आहे.

वैष्णवी हिचा हुंडासाठी छळ होत होता. लग्नात तिच्या वडिलांनी फॉर्च्यूनर गाडी, ५१ तळे सोने आणि इतर साहित्य दिले होते. त्यानंतर जमीन घेण्यासाठी दोन कोटींची मागणी वैष्णवीच्या माहेरच्या कुटुंबियांकडून करण्यात येत होती.