Pune Crime : पुण्यात चाललंय काय ? अवघ्या 3 वर्षांच्या मुलाचं अपहरण, अखेर पोलिसांनी शिताफीने केली सुटका

| Updated on: Mar 11, 2024 | 8:39 AM

पुणे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे. चोरी, दरोडा, घरफोडी नाहीतर अन्य काही, रोज कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांच्या बातम्या समोर येतच असतात. त्यातच आता अवघ्या तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची धक्कादायक बातमी समोर आल्याने खळबळ माजली

Pune Crime : पुण्यात चाललंय काय ? अवघ्या 3 वर्षांच्या मुलाचं अपहरण, अखेर पोलिसांनी शिताफीने केली सुटका
Follow us on

पुणे | 11 मार्च 2024 : पुणे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे ते गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे. चोरी, दरोडा, घरफोडी नाहीतर अन्य काही, रोज कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यांच्या बातम्या समोर येतच असतात. त्यातच आता अवघ्या तीन वर्षांच्या मुलाच्या अपहरणाची धक्कादायक बातमी समोर आल्याने खळबळ माजली आहे. अज्ञात व्यक्तीने एका स्थलांतरित मजुराच्या तीन वर्षांच्या लहान मुलाचं अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला. मात्र पुणे पोलिसांनी अथक मेहनतीने तपास करून त्या मुलाचा शोध घेत मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकातून त्याची सुटका केली. मात्र अपहरण करणारा आरोपी अद्यापही फरार आहे. पोलिस त्याचा कसून सोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, 5 मार्च रोजी रात्री पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून त्या चिमुकल्याचं अपहरण झालं होतं. तो मुलगा आणि त्याचे कुटुंब मूळचे मध्य प्रदेशातील असून सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी रेल्वे स्टेशनजवळ राहतात. काही कामानिमित्त ते पुण्याला आले होते. 5 मार्च रोजी रात्री तो मुलगा व कुटुंबीय पुणे रेल्वे स्थानकावर आरक्षण कार्यालयासमोर झोपले होते. पण पहाटेच्या सुमारास आपला लहान मुलगा बेपत्ता असल्याचे कुटुंबियांच्या लक्षात आले आणि त्यांचे धाबे दणाणले. त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार नोंदवली आणि पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांनी स्टेशनव व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 19-20 वर्षांच्या व्यक्तीने मुलाचे अपहरण केले आणि तो प्लॅटफॉर्म 3 वरून पुणे- लखनौ ट्रेनमध्ये चढला होता. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने दौंड, अहमदनगर, मनमाड आणि भुसावळ येथील रेल्वे स्थानकांवरील आणखी 200 फुटेज तपासले असता संशयित आरोपी भुसावळहून मुंबई सेंट्रलला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढला होता. अखेर पुणे पोलिसांच्या पथकाने स्थानिक रेल्वे पोलिसांच्या पथकांच्या मदतीने या लहानग्या मुलाची मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटका केली. पण तो आरोपी तेथून फरार होण्यात यशस्वी ठरला. त्याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश मिळालेलं नाही, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. संशयिताची कोणालाही माहिती मिळाली तर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केलं.