
इंदौरचा नागरिक असलेला राजा रघुवंशी याच्या खूनप्रकरणात हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा या दोघांसह एकूण 5 आरोपींना अटक केली. दरम्यान, शिलाँग पोलिसांचे एक पथक गेल्या दोन दिवसांपासून या हत्येच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी इंदौरमध्ये आहे. शिलाँग पोलिसांनी सोनमच्या कुटुंबातील सदस्यांसह इतरांची चौकशी केली आहे. या संपूर्ण प्रकरणात आणखी एक नाव समोर आलं असून सोनम ही संजय वर्मा नावाच्या व्यक्तीशी वारंवार बोलल्याची माहिती देखील समोर आली आहे. पण हाँ संजय वर्मा नेमका कोण आहे, हे सोनमच्या कुटुंबातील सदस्यांनाही माहीत नाहीये.
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात रोज नवनवे खुलासे होत असून आता संजय वर्मा या एका नवीन व्यक्तीचे नाव समोर येत आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अद्याप काहीही पुष्टी केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने संजय वर्मा यांच्या नंबरवर कॉल केला, तो तिच्या फोनमध्ये ‘हॉटेल’ म्हणून सेव्ह होता. 1 मार्च ते 8 एप्रिलपर्यं तब्बल 234 वेळा तिने या नंबरवर कॉल केला आणि ती समोरच्या व्यक्तीशी बोलली. मात्र आता राजाच्या हत्येनंतर संजय वर्मा याचा फोन मात्र बंद लागत आहे. आता या नव्या खुलाशानंतर या प्रकरणाचा तपास एका नव्या वळणावर येऊ शकतो.
पोलिसांच्या चौकशीत आणखी एक नाव समोर
सोनम आणि राज कुशवाह यांनी मिळून राजा रघुवंशी यांच्या हत्येचा कट रचला होता, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यांनीच हा मोबाईल नंबर संजय वर्माच्या नावाने घेतला असावा. जेणेकरून त्याचा वापर हत्येचा कट रचण्यासाठी करता येईल आणि जर कधी तपास झाला तर हे लोक पळून जाऊ शकतात कारण तो नंबर दुसऱ्याच्या नावावर आहे, असा संशय पोलिसांना आहे.
हत्येसाठी खरेदी केलं सिमकार्ड
राजाला मारण्यासाठी शिलाँगला आलेल्या विशाल, आकाश आणि आनंद यांनी एक नवीन सिम देखील खरेदी केले होते, असेही आतापर्यंतच्या तपासात दिसून आलं. राजाची हत्या केल्यानंतर त्यांनी नंबर बंद केला आणि सिम फेकून दिलं.
दरम्यान राजा रघुवंशी हत्या प्रकरणात सोनमसह आतापर्यंत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये सोनमचा कथित प्रियकर राज कुशवाह याचेही नाव आहे. याशिवाय राजचा चुलत भाऊ आणि त्याचा मित्र विशाल चौहान यांचेही नाव आहे. आता या खून प्रकरणात आणखी एक नाव जोडले गेले आहे, ते म्हणजे संजय वर्मा. चार जणांना अटक केल्यानंतर राजा हत्येचे गूढ उकलले आहे असे मानले जात होते, परंतु संजय वर्मा यांचे नाव समोर आल्यानंतर आणि सोनमच्या त्याच्याशी जे दीर्घ संभाषण झालं त्याची माहिती समोर आल्यानंतर, हे प्रकरण आता पुन्हा गुंतागुंतीचे झाले आहे.