
उदयपूर | 25 डिसेंबर 2023 : राजस्थानच्या मेवाड भागातील उदयपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दारूड्या पतीच्या मारहाणीला कंटाळून त्याच्या पत्नीनेच त्याचा काटा काढला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, पत्नीने आधी दारू प्यायली, आणि मग त्याच नशेच्या भरात तिने पतीची हत्या केली. एवढंच नव्हे तर तिने त्यासाठी तिच्या काकूचीही मदत घेतली. पतीची हत्या केल्यानंतर तिने त्याचं शव दूरवर असलेल्या एका खड्ड्यात फेकून दिलं. अखेर पोलिसांकडे हे प्रकरण गेल्यावर त्यांनी कसून चौकशी केली असता, हत्येचा उलगडा झाला. पत्नीनेच पतीचा जीव घेतल्याचे समोर आल्यावर, एकच खळबळ माजली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदयपूर जिल्ह्यातील झाडोल भागातील गोदाना गावात 19 डिसेंबर रोजी ही हत्या झाली. दलपत असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. पोलिसांनी याप्रकरणी हत्येतील आरोपी पत्नी थावरी आणि तिच्या काकूलाही अटक केली. दलपत हा रोज दारू पिऊन पत्नी धावरी हिला बेदम मारहाण कराचा. तसेच त्याच्या काकूलाही नेहमी शिवीगाळ करायचा.
झोपलेला असतानाच साडीने घोटला गला
दलपतच्या या कृत्याने त्याची पत्नी थावरी आणि काकू या दोघीही नाराज होत्या. त्यामुळे थावरीने पतीच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी तिने काकूलाही तिच्या बाजूला वळवून कटात सामील केले. रोजची शिवीगाळ यामुळे त्याची काकूही त्रस्त होती. त्यामुळे तिनेही हत्येच्या कटात सहभाग घेतला. 19 डिसेंबरच्या रात्री दलपत दारू पिऊन झोपला असताना थावरीने त्याचा साडीने गळा आवळून खून केला. काकूनेही तिला यात पूर्ण साथ दिली.
टॉयलेटला गेला नवरा, तो परत आलाच नाही
त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी थावरीने तो घरापासून दूर असलेल्या खड्ड्यात फेकून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्या घरच्यांनी विचारपूस केली असता, तो टॉयलेटला गेला होता, पण अजून परत आला नाही, असे थावरीने सांगितले. त्यानंतर 20 डिसेंबरला दलपतचा मृतदेह सापडला. तसेच मृतदेहावर जखमेच्या खुणा होत्या. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. पती-पत्नीच्या नात्यातील कटुतेची बाब समोर आल्यावर थावरी हिच्यावर संशय बळावला.
पोलिसांनी अखेर कठोरपणे तिची चौकशी केली असता दलपतच्या मृत्यूचे गूढ उलगडले. आपणच पतीची हत्या केल्याचे थावरीने कबूल केले. मात्र त्याची हत्या करण्यापूर्वी मी दारू प्यायले होते, असेही तिने कबूल केले. हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी थावर आणि तिची सहकारी काकू यांना पोलिसांनी रविवारी अटक केली. हत्येचा आरोप असलेल्या दोन्ही महिलांची पोलीस चौकशी करत आहेत.