
राज्यात हुंडाबळीच्या, विवाहीत महिलांच्या आत्महत्येच्या अनेक घटना समोर येत असतानाच आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील रामपूर मनिहरण भागातील जानखेडा गावात एका विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यूने संपूर्ण परिसर हादरून गेला. 24 वर्षीय दीपांशीचा मृतदेह तिच्या खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. पण पोलिस पोहोचण्याआधीच तिच्या सासरचे लोक घर सोडून फरार झाले. हुंड्यात स्कॉर्पिओची मागणी पूर्ण न केल्यानेच मुलीला सतत धमकावले जात होते, असा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या फॉरेन्सिक टीमने त्या खोलीतून महत्त्वाचे नमुने गोळा केले आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दीपांशी असं मृत विवाहीतेचं नाव आहे.
लग्नानंतर दिसला सासरच्यांचा क्रूर चेहरा
दीपांशीचे वडील चरण सिंग यांच्या सांगण्यानुसार, लेकीच्या लग्नाच्या काही महिन्यांतच तिच्या सासरच्या लोकांचे खरे स्वरूप उघड झाले. जोपर्यंत मोठी गाडी मिळत नाही तोपर्यंत ते तिला घरात ठेवणार नाहीत असं म्हणत तिचे सासू, सासरे आणि पती वारंवार छळ करायचे. मृत्यूच्या एक दिवस आधीच ते चंदीगडमध्ये असताना लेकीचा फोन आला, मुला पुन्हा जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असं तिने सांगितल्याचा आरोप चरण सिंग यांनी केला. त्यानंतर पाच्री 11 ला अचानक तिच्या सासऱ्यांचा फोन आला, तुमची मुलगी गार पडली आहे, लवकर या असं त्यांनी सांगितलं. ते ऐकून मुलीच्या घरच्यांनी तिथे तातडीने धाव घेतली, पण तिथे दिपांशी बेशुद्ध अवस्थेत दिसली आणि तिच्या सासरचे लोक फरार झाले होते.
आमची लेक खूप शांत होती
कुटुंबियांच्या सांगण्यानुार दीपांशी खूप शांत होती, पण हुंड्याच्या दबावामुळे तिचं आयुष्य नरक बनलं होतं. लग्नात स्विफ्ट कार आणि दागिने देऊनही, तिच्या सासरच्या लोकांचे समाधान झाले नाही. तिची सासू तिला टोमणे मारायची, “आमच्याकडे मोठ्या गाड्या आहेत, पण तू आमची बदनामी केली आहेस.” तिचा नवरा दारू पिऊन तिला मारहाण करायचा आणि सतत ओरडायचा, “स्कॉर्पिओ गाडी आणा नाहीतर मी तुला मारून टाकेन.” असा आरोप तिच्या वडिलांनी केला. आम्ही अनेक वेळा तिथे गेलो, पंचायत बसवली, समजावण्याचा प्रयत्न केला, पण दरवेळेस आमच्या लेकीला माहेरी पाठवलं जायचं, तिचा छळ व्हायचा असंही वडिलांनी सांगितलं.
यानंतर पोलिसांनी मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. तिच्या सासरच्या लोकांचा शोध घेतला जात आहे.