मामाचा काटा काढण्यासाठी मामीकडून जादूटोणा? आमदाराच्या मामाच्या हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपपत्रात काय म्हटलंय?

योगेश टिळेकर यांचा मामा सतीश वाघ यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून त्याला मोहिनी वाघ (पत्नी) ने भरीस घातले होते. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात सतीश याांच्यावर जादूटोण्याचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी मोहिनीसह अक्षय आणि इतर चार आरोपी पोलिसांच्या अटकेत आहेत.

मामाचा काटा काढण्यासाठी मामीकडून जादूटोणा? आमदाराच्या मामाच्या हत्याप्रकरणात नवा ट्विस्ट; आरोपपत्रात काय म्हटलंय?
सतीश वाघ हत्याप्रकरणात ट्विस्ट
Image Credit source: social media
| Updated on: Mar 13, 2025 | 11:05 AM

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ यांच्या हत्येमागे वाघ यांची पत्नीच असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे पोलिसांनी टिळेकर यांच्या मामीला म्हणजे सतीश वाघ यांच्या पत्नीला अटक केली आहे. या प्रकरणी आता एक मोठी अपडेट आली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चार्जशीट दाखल केली आहे. यात सतीश वाघ यांच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाल्याचंही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश तात्याबा वाघ (वय 58, रा. फुरसुंगी, सासवड रस्ता) यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार हा अक्षय जावळकर आहे. या खुनासाठी त्याला मोहिनी वाघनेच भरीस घातल्याचं पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे. अक्षय आणि मोहिनी या दोघांनीही सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे. लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोपपत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले. त्यात या प्रकाराचा उल्लेख करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

त्यांच्यावरही आरोपपत्र

अक्षय आणि मोहिनीसह अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवरही आरोपपत्र दाखल झाले आहे. सतीश वाघ यांचा 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपहरण करून 15 मिनिटांतच तब्बल 72 वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला होता. सतीश यांच्या मुलाने दिलेल्या फिऱ्यादीनुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य पाहता हा तपास पुढे हडपसर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. आता या प्रकरणाचे आरोपपत्र दाखल करण्यात आल्याने नव्या प्रकाराचा खुलासा झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश वाघ यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी अपहरण करण्यात आलं होतं. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यांची खून झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांचा मृतदेह उरळी ते जेजुरी रस्त्यावरील शिंदवणे घाटात आढळून आला होता. घाटामधील एका झाडीमध्ये त्यांच्या डोक्यावर लाकडी दांड्याने हल्ला करून हा खून करण्यात आला होता. पोलिसांनी या ठिकाणचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी ससून रुग्णालयात पाठवला होता.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एकूण 16 पथके स्थापन केली होती. या प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपींना आधी अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वैयक्तिक कारणातून सतीश यांचा खून करण्यात आल्याचं उघड झालं होतं. सतीश यांना मारण्यासाठी पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती. सतीश वाघ यांच्या शेजारीच राहणाऱ्या व्यक्तीने हा कट रचला असल्याचंही पोलीस तपासात उघड झालं होतं.