
तो महिलांशी प्रवासात ओळख वाढवायचा आणि त्यांचा विश्वासात घ्यायचा नंतर त्यांच्याकडील पैसे आणि दागिने घेऊन त्यांच्या डोक्यात दगड टाकून खून करायचा. अशा प्रकारे महिलांना फूस लावून त्यांचा खून करणारा हा सिरियल किलर अखेर तिसऱ्या महिलेचा खून करण्याचा प्रयत्न असताना त्याला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले आहे.
जळगावच्या अमळनेर येथील सुमठाणे आणि जानवे शिवारात दोन महिलांचे खून झाल्याने खळबळ उडाली होती. या महिलांचा सारख्या मोडस ऑपरेंडीने खून झाल्याने तो एकाच व्यक्तीने केल्याचा पोलिसांना संशय होता. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी गुप्तहेरांचे जाळे कामाला लावले होते.
महिलांचा अशा पद्धतीने खून झाल्यानंतर जळगाव पोलिस तपास करत असताना तिसऱ्या महिलेच्या खुनाच्या प्रयत्न झाला. मात्र या सराईत आरोपीला पोलिसांनी अटक करण्यात यश आले आहे. अनिल गोविंद संदानशिव असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.अमळनेर तालुक्यातील सुमठाणे येथील हा रहिवासी आहे.
हा आरोपी महिलांकडे असलेले पैसे तसेच दागिने मिळवण्यासाठी महिलांचे निर्घृन खून करायचा अशी माहिती तपासात समोर आले आहे. अटकेतील आरोपीने दोन्ही खुनाची, तसेच एक खुनाच्या प्रयत्नाच्या घटनेची कबुली दिली आहे. यापूर्वी शोभाबाई रघुनाथ कोळी,वैजंताबाई भोई यांचा खून करण्यात आला होता. आरोपी तिसऱ्या प्रयत्नात शहनाज बी या महिलेचा खुन करण्याचा बेतात होता.
प्रवासात आणि इतर ठिकाणी तो महिलांशी ओळख निर्माण करायचा. त्यानंतर महिलांच्या डोक्यात दगड टाकून तो खून करायचा अशी माहिती उघड झाली होती. अमळनेर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरित्या तपास करुन या प्रकरणाचा उलगडा करण्याची कामगिरी केली आहे. या दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या यशामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.