
देशाची राजधानी दिल्लीमध्ये एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. तिथे एका मुलाने त्याच्या 65 वर्षीय आईवर दोनदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडित महिला पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली तेव्हा सुरुवातीला य घटनेवर पोलिसांना विश्वासच बसला नाही. मात्र अखेर वृद्ध महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. एफआयआर दाखल होताच, पोलिसांनी तडक कारवाई केली आणि आईवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली मुलाला अटक केली. आरोपीचे वय सुमारे 39 असल्याचे समजते. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले, की माझे दुसऱ्या पुरुषाशी प्रेमसंबंध आहेत असा संशय मुलाला होता, त्यानंतर त्याने माझ्यावर चारित्र्यहीन (characterless) असल्याचा आरोप लावला आणि दोनवेळा माझ्यावर बलात्कार केला, अशी आपबिती महिलेने सांगितली.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य दिल्लीतील हौज काझी भागात राहणाऱ्या व्यक्तीने सौदी अरेबियाहून हज यात्रेनंतर परतलेल्या त्याच्या आईवर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला, एवढंच नव्हे तर त्याने तिच्यावर बलात्कारही केला असा आरोप आहे. ही माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या सांगण्यानुसार, पीडित महिला ही तिच्या 25 वर्षांच्या मुलीसह हौज काजी पोलिस स्टेशनला आली आणि तिने आपबिती कथन करत मुलाविरुद्ध तक्रार नोंदवली. या महिन्यात तिच्या मुलाने तिला अनेक वेळा मारहाण केली आणि लैंगिक शोषण केले, असा आरोप केला. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
सौदीवरून आल्यावर घडली घटना
दिल्ली पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्याने या धक्कादायक प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘पीडित महिलेने सांगितलं की, 25 जुलै 2025 रोजी ती तिच्या 72 वर्षीय पती आणि मुलीसह सौदी अरेबियाच्या यात्रेला गेली होती. प्रवासादरम्यान, तिच्या मुलाने तिच्या पतीच्या (आरोपीचे वडिलांच्या) फोनवर फोन केला आणि महिलेवर चारित्र्यहीन असल्याचा आरोप केला. तुम्ही लगेच दिल्लीला परत या आणि आईला घटस्फोट द्या अशी मागणीही त्याने केल्याचे महिलेने सागितलं होतं.
रिटायर्ड सरकारी कर्मचारी पतीसोबत राहते महिला
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही तिचे निवृत्त सरकारी कर्मचारी पती आणि एका मुलीसोबत हौज काझी परिसरात राहते. आरोपी मुलगाही त्यांच्यासोबत राहतो. पीडितेला एक मोठी मुलगी आहे जी विवाहित आहे आणि ती त्याच परिसरात तिच्या सासरच्या लोकांसोबत राहते. 17 जुलै रोजी पीडित महिला तिच्या पती आणि धाकट्या मुलीसह हजसाठी सौदी अरेबियाला गेली होती. आठ दिवसांनी (ते परदेशात असताना) आरोपीने त्याच्या वडिलांना फोन करून परत येण्यास सांगितले.
घटस्फोटासाठी टाकला दबाव
महिलेने तिच्या तक्रारीत पुढे सांगितलं की आहे की, ‘त्याने (आरोपी मुलाने) वडिलांना लगेच दिल्लीत येण्यास सांगितलं आणि आईला घटस्फोट द्या असेही तो म्हणाल्याचे महिलेने नमूद केलं. आईचे इतर पुरुषांसोबत विवाहबाह्य संबंध आहेत’ असा दावा मुलाने केला होता. त्यानंतर ते घरी परत आल्यावर मुलाने आईला चारित्र्यहीन म्हणत तिच्यावर नको नको ते आरोप केले. आणि त्यानंतर त्याने आपल्याच जन्मदात्या आईवर एकदा नव्हे तर दोनवेळा शारीरिक अत्याचार केला, असे तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत मुलाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.