अरुण गवळी याला नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा जामीन

शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्ये प्रकरणात अटकेत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला अखेर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

अरुण गवळी याला नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा जामीन
| Updated on: Aug 28, 2025 | 8:26 PM

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याला शिवसेना नगरसेवक नगरसेवक जामसंडेकर हत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. कमलाकर जामसंडेकर यांची घाटकोपर येथे त्यांच्या निवासस्थानी भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात १८ वर्षानंतर अरुळ गवळी याला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एमएम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटिश्वर सिंह यांनी कमलाकर जामसांडेकर खून प्रकरणात तुरुंगात दीर्घकाळ तुरुंगवास भोगल्यामुळे अरुण गवळीची जामिनावर सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. अरुण गवळीची बाजू अ‍ॅड. शंतनु आडकर यांनी मांडली आहे.

अरुण गवळी याला ज्यावेळी कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्या प्रकरणात अटक झाली तेव्हा अरुण गवळी आमदार होता. एखाद्या आमदाराला अशा प्रकारे खुनाच्या गुन्ह्यात नंतर जन्मठेप सुनावण्यात आली होती. एखाद्या राजकीय नेत्याच्या खूनात आमदाराला झालेली ही जन्मठेप चर्चेची ठरली होती.

जामसंडेकर यांची हत्या

2 मार्च 2007 रोजी सायंकाळी आपल्या मुंबईतील घाटकोपर येथील घराजवळ बसलेल्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांची गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती. ते आपले काम संपवून घरात टीव्ही पाहात असताना असल्फा व्हीलेज येथील रुमानी मंझील चाळीतील घरात शिरुन मारेकऱ्यांनी त्यांची हत्या केली होती.

कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्या प्रकरणात मुंबईतील सत्र न्यायालयाने अरुण गवळी आणि इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होता.सुरेश पांचाळ, दिनेश नारकर आणि गणेश साळवी या सह आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली होती.

त्यावेळी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूकात शिवसेनेचे कमलाकर जामसंडेकर यांनी अरुण गवळी याच्या अखिल भारतीय सेना पक्षाचे उमेदवार अजित राणे याचा अवघ्या ३६७ मतांनी पराभव केला होता. त्यानंतर काही काळात जामसंडेकर नगरसेवक म्हणून कामाला लागले असतानाच त्यांची हत्या करण्यात आली होती.

जामसंडेकर यांच्या हत्येसाठी सुपारी

क्राइम ब्रांचच्या पथकाने अरुण गवळी याला २१ मे २००८ रोजी त्याचे भायखळा येथील निवासस्थान असलेल्या दगडी चाळीतून अटक केली. विशेष म्हणजे त्यावेळी अरुण गवळी मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघाचा आमदार होता. राजकीय शत्रुत्वामुळे सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनी कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येसाठी सुपारी दिली होती. अरुण गवळी याला हत्येसाठी ३० लाख रुपयांची खंडणी दिली होती. त्यानंतर सदाशिव सुर्वे आणि साहेबराव भिंताडे यांनाही अटक झाली. २७ जुलै २००८ ला मुंबई पोलिसांनी सर्व ११ आरोपींना मकोका म्हणजेच महाराष्ट्र ऑर्गनाईड क्राईम कंट्रोल अॅक्ट लावला होता.