मोदीजी, अरिजीतच्या आवाजातील गाण्याची निर्मिती, हीच अखेरची इच्छा, 16 वर्षीय तरुणाची सुसाईड नोट

| Updated on: Oct 12, 2021 | 3:38 PM

मुलाने लिहिलेली 'सुसाईड नोट' त्याच्या मृतदेहाजवळ सापडली आहे ज्यात त्याने म्हटले आहे की तो एक चांगला डान्सर बनू शकला नाही, कारण त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याला पाठिंबा देत नाहीत.

मोदीजी, अरिजीतच्या आवाजातील गाण्याची निर्मिती, हीच अखेरची इच्छा, 16 वर्षीय तरुणाची सुसाईड नोट
Narendra Modi, Arijit Singh
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील एका किशोरवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. “एक चांगला डान्सर बनण्यात अपयशी ठरल्याने” त्याने आत्महत्या केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. संबंधित 16 वर्षीय तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक विनंती करणारी सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये प्रसिद्ध गायक अरिजीत सिंग याच्या आवाजात आणि सुशांत खत्री या नेपाळी कलाकाराने कोरिओग्राफ केलेल्या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ तयार करण्याची विनंती त्याने केली होती.

रेल्वे ट्रॅकवर झोपून आत्महत्या

संबंधित मुलगा अकरावीत शिकत होता. त्याने रविवारी रात्री रेल्वे ट्रॅकवर झोपून आत्महत्या केल्याची माहिती झाशी रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी संजीव नयन शर्मा यांनी पीटीआयला दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलाने लिहिलेली ‘सुसाईड नोट’ त्याच्या मृतदेहाजवळ सापडली आहे ज्यात त्याने म्हटले आहे की तो एक चांगला डान्सर बनू शकला नाही, कारण त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याला पाठिंबा देत नाहीत.

सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय

“सुसाईड नोटमध्ये, मुलाने असेही म्हटले आहे की त्याच्या मृत्यूनंतर एक म्युझिक व्हिडिओ बनवावा ज्यामध्ये अरिजीत सिंगने गाणे गायले असावे, आणि सुशांत खत्री या नेपाळी कलाकाराने त्याचे नृत्य दिग्दर्शन करावे, म्हणजे आपल्या आत्म्यास शांती मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींना माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी, असे आवाहन त्याने चिठ्ठीत केल्याचेही पोलीस अधिकारी संजीव नयन शर्मा म्हणाले.

नागपुरात भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून घरमालकाचा गळफास

दुसरीकडे, भाडेकरुच्या धमक्यांना त्रासून घर मालकाने गळफास घेतला. नागपूरमधील जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत आत्महत्येची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी घरमालकाने व्हिडीओ तयार केला होता. पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरु केला.

काय आहे प्रकरण?

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कस्तुरबा नगर परिसरात मुकेश रिझवानी यांचे घर आहे. 2019 साली ज्यावेळी कोरोना नागपूरमध्ये धुमाकूळ घालत होता, त्यावेळी घर मालक मुकेश रिझवानी यांनी राजेश सेतीया नामक इसमाला घराच्या काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या.

घरमालकाला जीवे मारण्याची धमकी 

या काळात राजेश सेतीया यांनी घर मालक मुकेश रिझवानी यांना घर भाडे देणे अपेक्षित होते, मात्र ज्यावेळी मुकेश हे राजेश सेतीया यांच्याकडे घरभाडे मागण्यासाठी गेले तेव्हा राजेश सेतीया आणि त्याचा भाऊ मूलचंद सेतीया यांनी मुकेश रिझवानी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

घर रिकामं करण्यासाठी साडेचार लाखांची मागणी

आरोपी भाडेकरु राजेश सेतीया हा मुकेश यांना वारंवार धमकी देत होता. घर रिकामे करून हवे असले तर साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, अशी मागणी आरोपी सेतीया याने मुकेश यांच्याकडे केली. घर रिकामे झाल्यास कायमची कटकट सुटेल म्हणून मुकेश रिझवानी यांनी सेतीयाला काही पैसेही दिले. मात्र, त्यानंतर आरोपी राजेश सेतीयाने घर रिकामे करण्याऐवजी आणखी पैसे मागितले.

भाडेकरुकडून सुरु असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी भाऊ फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

भाडेकरुवर आरोप, व्हिडीओ व्हायरल

घरमालक मुकेश यांना भाडेकरु राजेश सेतीया हा शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता, त्यामुळे ते गेल्या काही महिन्यांपासून मानसिक दडपणाखाली वावरत होते. राजेश घर रिकामे करत नसल्याने मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र त्यापूर्वी मुकेश यांनी एक व्हिडीओ तयार केला, ज्यामध्ये त्यांनी भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा सांगून तो व्हिडीओ व्हायरल केला आहे.

संबंधित बातम्या :

कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर उस्मानाबादेत महिलेचा मृत्यू, नातेवाईकांची रुग्णालयात तोडफोड

पिंपरीतील कुख्यात रावण टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या, साताऱ्यातून सहा जणांना बेड्या

पत्नीसोबत अनैतिक संबंधांचा संशय, तरुणाच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला, नाशकात पाच जण अटकेत