ठाणे पोलीस सकाळीच मुंब्रा खाडी परिसरात; हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास सुरू

| Updated on: Mar 06, 2021 | 8:50 AM

काल शुक्रवारी सकाळी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडी परिसरात सापडला होता. (thane police start investigation in mansukh hiren death case)

ठाणे पोलीस सकाळीच मुंब्रा खाडी परिसरात; हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास सुरू
मनसुख हिरेन
Follow us on

ठाणे: काल शुक्रवारी सकाळी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडी परिसरात सापडला होता. त्या ठिकाणी आज सकाळीच ठाणे पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांनी या संपूर्ण परिसरांची कसून पाहणी सुरू केली असून हिरेन मृत्यूप्रकरणी पुरावे शोधण्यास सुरुवात केली आहे. (thane police start investigation in mansukh hiren death case)

काल सकाळी दहा साडे दहाच्या सुमारास मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा खाडीत सापडला होता. हिरेन यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला तेव्हा त्यांच्या तोंडात 5 ते 6 रुमाल कोंबलेले दिसत होते. त्यामुळे हिरेन यांच्या मृत्यूवरून संशय व्यक्त करण्यात येत होता. हिरेन यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. काल हिरेन यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदनही करण्यात आलं. आज सकाळीच दोन पोलिस मुंब्रा खाडी परिसरात आले आहेत. या परिसरातील प्रत्येक भाग पिंजून काढण्यात येणार असून हिरेन यांचा मृतदेह पाहणाऱ्या लोकांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. तसेच या परिसरातील काही लोकांशी बातचीत करून हिरेन मृत्यूप्रकरणी काही धागेदोरे मिळतात का? याचाही पोलिसांकडून शोध घेतला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाली होती. अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडली होती, तिच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्यातल्या खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन असं गाडीमालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे.

वाझेंवर आरोप

या आधी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी वाझेंवर काही आरोप केले होते. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं घर ठाण्यात आहे. जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातच सापडली. इतकंच नाही, जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमलं आहे. हे आश्चर्यकारक आहे, असं फडणवीस म्हणाले होते. हिरेन बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि इतर कुणीही क्रॉफर्ड मार्केटला पोहोचले नाहीत. सचिन वाझे सगळ्यात आधी तिथे पोहोचले. त्यांनाच तिथे त्यांना चिठ्ठी सापडली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं, असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. (thane police start investigation in mansukh hiren death case)

 

संबंधित बातम्या:

ठाणे पोलिसांचा भाग नसलेले सचिन वाझे पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे?; आशिष शेलारांचा सवाल

शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा?; मनसेचा सवाल

अर्णबला घरातून उचलणारे ते आता अंबानी स्फोटकप्रकरणात चर्चेत असलेले एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे कोण?

(thane police start investigation in mansukh hiren death case)