रात्रीच्या वेळी धाडसी दरोडा टाकून पसार झाले, पण एक चूक महागात पडली !

| Updated on: Jun 06, 2023 | 2:48 PM

टिपरने माहिती दिली. मग आरोपींनी रेकी केली आणि धडासी दरोडा टाकला. घरातील सर्व मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झाले. पण एक चूक त्यांच्या अंगलट आली.

रात्रीच्या वेळी धाडसी दरोडा टाकून पसार झाले, पण एक चूक महागात पडली !
नागपुरमधील दरोडा प्रकरणी सहा आरोपींना अटक
Image Credit source: TV9
Follow us on

नागपूर : घरमालकाचे हातपाय बांधून रात्रीच्या सुमारास घरात धाडसी दरोडा टाकल्याची घटना नागपूरच्या वाठोडा परिसरात घडली. दरोडेखोरांनी घरातील सर्व दागिने आणि पैसे लुटून नेले. मात्र दरोडेखोरांना एक चूक नडली आणि थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दरोड्यातील आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने काही तासातच शोधून काढण्यात यश मिळवलं. यामध्ये सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन आरोपी अद्याप फरार आहेत. यातील दोन आरोपींवर अनेक गुन्हे दाखल आहेत. दरोडा प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली होती.

टिपरने दिलेल्या माहितीवरुन दरोडा टाकला

नागपूरच्या वाठोडा पोलीस स्टेशन हद्दीतील चिकटे नामक व्यक्तीच्या घरामध्ये रात्रीच्या वेळेला धाडसी दरोडा टाकण्यात आला. या दरोड्यामध्ये आठ आरोपींचा समावेश होता. या आरोपींनी घरात घुसत घरमालकाचे हातपाय बांधून त्याच्या घरातील मुद्देमाल आणि साहित्य चोरून नेले. महत्त्वाचं म्हणजे हा दरोडा टाकणाऱ्यांमध्ये एक टीप देणारा होता. या टिपरने घरातील पैसे आणि दागिन्यांची माहिती दिली. त्यानुसार आरोपींनी आधी त्या घराची रेकी केली, मग रात्रीच्या सुमारास आठ जणांनी मिळून धाडसी दरोडा टाकला.

एक चूक महागात पडली

दरोडा टाकण्यासाठी आरोपी एका ऑटो रिक्षातून गेले होते आणि तेच त्यांना महागात पडलं. पोलिसांनी ऑटो रिक्षाच्या नंबर वरून आरोपींचा शोध घेतला. मग एका मागोमाग पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. यातील दोन आरोपी अजून फरार आहेत. त्यामध्ये एक या दरोड्याचा मास्टर माईंड आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत माजली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र पोलिसांनी काही तासातच या दरोड्याचा पर्दाफाश करून आरोपींना अटक केली आहे.

हे सुद्धा वाचा