रेस्टॉरंट बंद करुन घरी चालला होता मॅनेजर, पण वाटेतच त्यांनी गाठले अन्…

नेहमीप्रमाणे मॅनेजर रेस्टॉरंट बंद करुन घरी चालला होता. पण घरी पोहचण्याआधीच रुग्णालयात पोहचला. घटना ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

रेस्टॉरंट बंद करुन घरी चालला होता मॅनेजर, पण वाटेतच त्यांनी गाठले अन्...
कल्याणमध्ये रेस्टॉरंट मॅनेजरवर हल्ला
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: May 30, 2023 | 11:07 PM

कल्याण : काशीष बार अँड रेस्टारंट मॅनेजरच्या डोक्यात वजनदार वस्तू मारून दीड लाखाची रोकड आणि स्कूटी घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना कल्याण कोळसेवाडी परिसरात घडली आहे. सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे बार आणि हॉटेल चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नेहमीप्रमाणे बार बंद करुन घरी जात असताना मॅनेजरवर हल्ला करण्यात आला.

घरी जात असताना दबा धरुन बसलेल्या आरोपींनी हल्ला केला

कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरात काशीष बार रेस्टारंट असून, या बारमध्ये भीमा सिंह हे मॅनेजरचे काम करतात. नेहमीप्रमाणे काल भीमा सिंह हे रेस्टारंट बंद करुन दिवसभराचा गल्ला, रोकड सोबत घेत नांदिवली रस्त्याने स्कूटीवरुन घरी परतत होते. इतक्यात काकाचा ढाबा परिसरात काही हल्लेखोर हत्यार घेऊन दबा धरुन बसले होते. ज्या क्षणी स्कूटीवरुन भीमा हे आले. तेव्हा दबा धरुन बसलेल्या चोरट्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात भीमा हे जखमी झाले. गाडीवरून खाली पडले. त्याचवेळी हल्लेखोरांनी भिमासिंग यांच्याकडे असलेली दीड लाखाची रोकड हिसकावून घेतली.

जखमी मॅनेजरवर रुग्णालयात उपचार सुरु

इतकेच नाही तर त्यांच्या ताब्यातील स्कूटीही देखील घेतली आणि हल्लेखोर पसार झाले. जखमी भीमा सिंह यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी कोळसेवडाी पोलिसांनी हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन, सीसीटीव्हीच्या माध्यमातून या घटनेचा तपास सुरु केला आहे.