मुंबईच्या आर्मी हेडक्वार्टरवरच चोराचा डल्ला, कर्नलच्या केबिनमधून पिस्तुल आणि कॅश चोरली आणि गोव्याला मौज करायला गेले !
मुंबईतील कुलाबा नेव्हीनगरातून एका जवानाची इन्सास रायफल चोरीची घटना ताजी असतानाच मुंबईच्या आर्मी मुख्यालयातील कर्नलच्या केबिनमधून त्याचे पिस्तुल आणि कॅश चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे.

मुंबईतून देशाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण करणारी मोठी घटना उघडकीस आली आहे. आर्मी हेडक्वॉर्टरमधून कर्नलच्या केबिनमधून पिस्तुल आणि जीवंत काडतूसे चोरी झाली होती. चोरट्यांनी आर्मी हेडक्वॉर्टरची सुरक्षा भेदून चोरीकरुन पाबोरा केला होता. चार दिवसांच्या शोधानंतर या तिघा चोरट्यांना मुंबई क्राईम ब्रँचने अटक करण्यात यश मिळवले आहे.
मुंबईतील आर्मी डेडक्वॉर्टरची कडेकोट सुरक्षा भेदून एका कर्नलच्या केबिनमधून तिघा चोरट्यांनी पिस्तुल, ९ जीवंत काडतूसे, चांदी आणि तीन लाखांची रोकड पळवली. चार दिवसांच्या तपासानंतर मुंबई क्राईम ब्रँच यूनिट 12 ने मालाड येथून तिघा आरोपींना अटक केली. आरोपी चोरी केल्यानंतर मौजमजा करण्यासाठी गोव्याला पसार झाले होते. ते घरी परतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.
मुद्देमाल जप्त केला
मालाड येथून आरोपींना क्राईम ब्रँचने अट केली. त्यांच्याकडून कर्नलची पिस्तुल, ९ जीवंत काडतूसे, साडे चारशे ग्रॅम चांदी आणि तीन लाख रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत. तसेच चोरीच्यावेळी वापरलेले काही सामानही पोलिसांनी जप्त केले आहे.
चोरीनंतर गोव्यात मौज-मस्ती
आरोपींनी आर्मी हेडक्वॉर्टरच्या मागच्या रस्त्यातून आत शिरकाव केला आणि चोरी केली. चोरी केल्यानंतर हे सर्व आरोपी गोव्याला पळाले आणि त्यांनी तेथे मौजमजा केली. जेव्हा ते मुंबईला आले तेव्हा त्यांच्या हातात थेट बेड्या पडल्या.
हे सर्व आरोपी मालाडच्या कुरार परिसरात रहात होते. त्यांनी याआधी अनेक चोऱ्या केल्या आहेत. त्यांच्या विरोधात चोरी आणि लुटमारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी सराईत चोर असून अनेक ठिकाणी त्यांनी चोऱ्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुढील तपास दींडोशी पोलिस करणार
सोमवारी क्राईम ब्रँच युनिट १२ च्या टीमने आरोपींना दींडोशी पोलिसांच्या हवाली केले. आता या प्रकरणाचा पुढील तपास दींडोशी पोलिस करणार आहेत. याआधी कुलाबा नेव्हीनगरात एका जवानाची इन्सास रायफल चोरट्याने पळवल्याची घटना घडली होती. आता थेट आर्मी हेडक्वॉर्टरवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याचे उघडकीस आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
